1 लाखाचा समभागांचा टप्पा प्राप्त करणारी देशातील पहिली कंपनी ठरली : खेळणी, फुगे निर्मितीपासून कंपनीची सुरुवात
मुंबई : भारतातील सर्वात मोठी टायर उत्पादन करणारी बहुराष्ट्रीय कंपनी एमआरएफ म्हणजेच मद्रास रबर फॅक्टरीच्या शेअर्सनी इतिहास रचला आहे. एमआरएफच्या शेअरने मंगळवारी (13 जून) ट्रेडिंग सत्रात एक लाख रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडला. असे करणारी एमआरएफ ही भारतातील पहिली कंपनी ठरली आहे.
शेअरने इंट्राडे उच्चांक 1,00,439.95 रुपयाचा गाठला
या समभागाने ट्रेडिंग सत्रादरम्यान इंट्राडे आणि 52 आठवड्यांचा उच्चांक 1,00,439.95 रुपयावर केला. तथापि, एमआरएफचा शेअर 931.45 रुपये किंवा 0.94 टक्केच्या वाढीसह 99,900 वर बंद झाला. त्याचा शेअर ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला 99,150 रुपयांवर उघडला होता. गेल्या एका वर्षात या शेअरमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हा एका वर्षात 46 टक्के वाढला आहे. एमआरएफचे शेअर्स 17 जून 2022 रोजी बीएसईवर 65,900.05 या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.
एमआरएफ बाजारमूल्य
एमआरएफ कंपनीकडे एकूण 42,41,143 शेअर्स आहेत, त्यापैकी 30,60,312 शेअर्स सार्वजनिक भागधारकांकडे आहेत. दुसरीकडे, कंपनीच्या प्रवर्तकांकडे 11,80,831 शेअर्स आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 42.37 हजार कोटी रुपये आहे.
चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) म्हणजेच चौथ्या तिमाहीमधील एमआरएफ चे निकाल सकारात्मक राहिले होते. मार्च तिमाहीत एमआरएफचा स्वतंत्र नफा 162 टक्क्यांनी वाढून 410.66 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीची ऑपरेटिंग कामगिरी मजबूत झाली आहे.
कंपनीच्या ऑपरेशन्समधून स्टँडअलोन महसूल वार्षिक 10 टक्के वाढून 5,725.4 कोटी रुपये झाला आहे. एवढेच नाही तर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 169 रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
जगातील 75 हून अधिक देशांमध्ये निर्यात
एमआरएफचे भारतात 2,500 पेक्षा जास्त वितरक आहेत. एवढेच नाही तर ही कंपनी जगातील 75 हून अधिक देशांमध्ये निर्यात करते.
एमआरएफची सुरुवात खेळणी-फुगे बनवण्यापासून झाली. चेन्नईस्थित एमआरएफ कंपनीचे पूर्ण नाव मद्रास रबर फॅक्टरी आहे. या कंपनीने 1946 मध्ये खेळण्यांचे फुगे बनवून सुरुवात केली. कंपनीने 1960 पासून टायर्सचे उत्पादन सुरू केले. आता ही कंपनी भारतातील टायर्सची सर्वात मोठी उत्पादक आहे.
अशी झाली एमआरएफची सुरुवात
के एम मैमन मॅपिलाई हे एमआरएफचे संस्थापक आहेत. ते आधी फुगे विकायचे. केरळमधील ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेले मापिलाई यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांना अटक झाली. वडील तुरुंगात गेल्यानंतर घरची संपूर्ण जबाबदारी मापिल्लई यांच्या खांद्यावर आली, त्यांना 8 भावंडे होती. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी रस्त्यावर फुगे विकण्यास सुरुवात केली. 6 वर्षे फुगे विकल्यानंतर 1946 मध्ये त्यांनी रबरचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
मॅपिल्लई यांनी त्यानंतर मुलांसाठी खेळणी बनवण्यास सुरुवात केली. 1956 पर्यंत त्यांची कंपनी रबर ट्रेडिंग कंपनी बनली होती. हळूहळू टायर उद्योगाकडे त्यांचा कल वाढत गेला.
1960 मध्ये त्यांनी रबर आणि टायर्सची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली. पुढे व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी अमेरिकेच्या मॅन्सफिल्ड टायर आणि रबर कंपनीशी करार केला.
सन 1995 पर्यंत कंपनीचा व्यवसाय देश-विदेशात पसरला होता. यानंतर अमेरिकन कंपनी मॅन्सफिल्डने एमआरएफमधील आपला हिस्सा विकला आणि कंपनीचे नाव बदलून एमआरएफ लिमिटेड करण्यात आले.मापिलाई यांचे 2003 मध्ये वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. मॅपिलाई यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी व्यवसायाची धुरा सांभाळली आणि लवकरच त्यांची कंपनी नंबर 1 बनली. टायर उत्पादक कंपनीनेही खेळात उत्सुकता दाखवली.









