कुडाळ येथे भरती असल्याची जाहिरात बोगस : कंपनीकडून मुख्यमंत्र्यांकडे खुलासा सादर
पणजी : एमआरएफ कंपनीची नोकरभरती आयटीआय फर्मागुढी येथे होणार असल्याचा खुलासा कंपनीने केला आहे. तसे खुलासा पत्र कंपनीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठवल्याचे म्हटले आहे. गोव्यातील एमआरएफ टायर्स कंपनीतर्फे कुडाळ – सिंधुदुर्ग येथे आज शुक्रवार दि. 12 सप्टेंबर रोजी नोकरभरती मेळावा आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) तशी जाहिरात सिंधुदुर्गात करण्यात आली होती. गोवा फॉरवर्ड व रिव्होल्युशनरी गोवन्स या दोन्ही पक्षांनी यासंदर्भात आवाज उठवल्यानंतर ती नोकरभरतीची माहिती चुकीची आणि बोगस असल्याचा दावा कंपनीच्यावतीने करण्यात आला आहे. कुडाळ येथे जाहिरात करण्यात आलेल्या माहितीनुसार, एमआरएफ टायर कंपनी 250 प्रशिक्षणार्थिची भरती करत असून आठवी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी आहे. त्यांना रु. 20 हजारपर्यंत प्रति महिना पगार, राहाण्याची, भोजनाची व्यवस्था अशा सुविधा मिळणार असल्याचे त्यात नमूद आहे. दरम्यान, कुडाळातील नोकरभरतीची करण्यात आलेली जाहिरात बोगस असल्याचे स्पष्टीकरण कंपनीतर्फे आले आहे.









