ऑनलाईन टीम / अमरावती :
राणा दाम्पत्य आणि शिवसेना असा वाद सुरू असतानाच अमरावतीचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घारड (Yogesh gharad) यांच्यावर शनिवारी रात्री 9 च्या सुमारास अज्ञातांनी बेछूट गोळीबार केला. वरुड शहरातील मुलताई चौक परिसरात ही घटना घडली. गोळीबारात घारड हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नागपूरला हालविण्यात आले आहे.
घारड हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख आहेत. रात्री 9 च्या सुमारास घारड हे वरुड शहरातील मुलताई चौक परिसरात असताना त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. घारड यांच्या मांडीला गोळी लागली असून ते जखमी झाले आहेत. यानंतर त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिकच्या उपचारासाठी घारड यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान, राहुल तडस या व्यक्तीने हा हल्ला केल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांनी त्यांच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून तडस याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.









