मिशिगन प्रांतातून दिमाखदार विजय

वृत्तसंस्था /मिशिगन
मूळचे बेळगावचे आणि आता अमेरिकेचे नागरिक श्री ठाणेदार यांनी अमेरिकेच्या काँगेसची निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे ते आता अमेरिकेचे खासदार झाले आहेत. बेळगावच्या सुपुत्राने अमेरिकेत असे देदीप्यमान यश मिळविण्याची ही पहिलीच घटना आहे. ठाणेदार डेमॉपेटिक पक्षाचे नेते आहेत. बुधवारी दुपारीच त्यांच्या विजयाचे वृत्त बेळगावात थडकल्यानंतर त्यांच्या निकटवर्तियांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
67 वर्षांचे ठाणेदार हे मिशिगन प्रांताच्या विधानसभेचे सदस्य म्हणूनही निवडून आलेले आहेत. खासदारपदाच्या निवडणुकीत त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे प्रतिस्पर्धी मार्टेल बिव्हींग्ज यांचा मोठय़ा अंतराने पराभव केला. ठाणेदार यांनी 84,096 मते मिळविली. तर, प्रतिस्पर्धी असलेल्या बिव्हींग्ज यांना 27,366 मते प्राप्त झाली.
पक्षांतर्गत संघर्षातही यश
मिशिगन प्रांताची उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांना डेमॉपेटिक पक्षातील आपल्या प्रतिस्पर्ध्यांशीही दोन हात करावे लागले होते. ऍडॅम होलियर, पोर्शिया रॉबर्टसन, जॉन कॉनयर्स (तिसरे) असे अनेक स्पर्धक या जागोसाठी प्रयत्नशील होते. पण अखेर गुणवत्ता, समाजकार्य आणि प्रयत्न यांच्या जोरावर ठाणेदार यांनी हा पक्षांतर्गत संघर्ष यशस्वीरित्या हाताळला आणि डेमॉपेटिक पक्षाची उमेदवारी पटकाविली. त्यानंतर त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार करुन आपल्या रिपब्लिकन प्रतिस्पर्ध्याला प्रचंड बहुमताने मात देण्याचा पराक्रम केला आहे.
व्यवसाय आणि राजकारणात यश
1990 मध्ये त्यांनी अमेरिकेतील एक तीन कर्मचाऱयांची कंपनी विकत घेऊन ती अल्पावधीत नावारुपाला आणली. अवघी दीड लाख डॉलर्सची उलाढाल असणारी ही कंपनी त्यांनी 6 कोटी डॉलर्सपेक्षाही मोठी केली आणि 400 लोकांना रोजगार दिला. अमेरिकेत त्यांनी अनेक व्यवसाय केले. तेथे ते एक यशस्वी उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत. व्यवसाय करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. स्थानिक राजकारणात यश मिळवत त्यांनी आता खासदार पदापर्यंत मजल मारली आहे. 2018 मध्ये त्यांनी मिशिगन प्रांताच्या गव्हर्नर पदासाठीची निवडणूकही लढविली होती. तथापि त्यांना अपयश आले होते. राजकारण आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी यशापयशाचे चढउतार झेलत स्वतःला प्रगतीपथावर ठेवले आहे.
अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीयांचा प्रभाव
अमेरिकेच्या काँगेस आणि सिनेट या प्रतिनिधीगृहांसाठीच्या मध्यावधी निवडणुका दर दोन वर्षांनी घेण्यात येतात. नुकत्याच पार पडलेल्या या निवडणुकीत ठाणेदार यांच्यासह आणखी चार भारतीयांनी काँगेसचे खासदार होण्यात यश मिळविले आहे. हे चारही डेमॉक्रेटिक पक्षाचे आहेत. त्यांची नावे राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना आणि प्रमिला जयपाल अशी आहेत. कृष्णमूर्ती हे इलिनॉइसमधून सलग चारवेळा निवडून आले आहेत. सिलिकॉन व्हॅलीतून रो खन्ना आणि वॉशिंग्टनमधून तर भारतीय वंशाच्या प्रतिनिधींपैकी सर्वात ज्येष्ठ अमी बेरा यांनी कॅलिफोर्निया येथून निवडणूक जिंकली आहे. अमेरिकेच्या राजकारणात भारतीय वंशाचे नागरिक स्थिरावू लागल्याचे हे चिन्ह आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
अरुणा मिलर यांनी घडविला इतिहास
भारतीय वंशाच्या अरुणा मिलर यांनी मेरीलँड प्रांताच्या लेफ्टनंट गव्हर्नर पदाची प्रतिष्ठेची निवडणूक जिंकली आहे. अमेरिकेतील एखाद्या प्रांताच्या लेफ्टनंट गव्हर्नर पदाची निवडणूक भारतीय वंशाच्या उमेदवाराने जिंकण्याची ही प्रथमच वेळ आहे. त्यामुळे त्यांचा विजय अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला आहे. अमेरिकेच्या विविध प्रांतांच्या विधानसभांच्या निवडणुकांमध्येही अनेक भारतीय निवडून आले आहेत.
काँगेसमध्ये रिपब्लिकनांचे वर्चस्व, सिनेटसाठी चुरस
अमेरिकेचे कनिष्ठ सभागृह (भारताच्या भाषेत लोकसभा) काँगेसमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत होण्याची शक्यता आहे. या सभागृहात आतापर्यंतच्या परिणामांनुसार रिपब्लिकन पक्षाने 199 तर डेमॉपेटिक पक्षाने 178 जागा मिळविल्या आहेत. तर ज्येष्ठ सभागृह सिनेटमध्ये दोन्ही पक्षांना आतापर्यंत समान म्हणजे 48 जागा मिळाल्या आहेत. आणखी काही जागांसाठी चुरस सुरु आहे.
मीरापूर गल्ली, शहापूरचे रहिवासी…
1979 मध्ये ठाणेदार अमेरिकेला गेले. तत्पूर्वी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे वास्तव्य शहापूरच्या मीरापूर गल्लीत होते. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांना आपला अभ्यास आणि कुटुंब यांचे उत्तरदायित्व पेलण्यासाठी नोकरीही करावी लागली होती. मुंबईच्या भाभा अणुशक्ती केंद्रात त्यांनी काहीकाळ नोकरी केली. त्यांनी बेळगावातच रसायनशास्त्र (केमिस्ट्री) या विषयात बीएस्सीची पदवी घेतली आहे. पुढे मुंबई विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर अमेरिकेच्या ऍक्रॉन विद्यापीठात त्यांनी पॉलिमर केमिस्ट्री या विषयात पीएचडी केली. अमेरिकेच्या एका कंपनीत त्यांनी नंतर प्रोजेक्ट लीडर म्हणून काम केले.









