पुणे / प्रतिनिधी :
राज्य सेवा परीक्षेतील बदल 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षार्थींनी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक येथे सोमवारी आंदोलन केले. आश्वासन नको अंमलबजावणी हवी, अशी भूमिका घेत हे आंदोलन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2023 पासून राज्यसेवा परीक्षेत बदल करण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाविरोधात एमपीएससी विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून, या विद्यार्थ्यांच्या हातात आपल्या मागण्यांचे फलक झळकत होते. निर्णय झाला, अंमलबजावणी कधी, राज्य सेवा वर्णनात्मक मुख्य परीक्षा पद्धती 2025 पासूनच लागू करा, अशा मागण्या या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या. काँग्रसनेही विद्यार्थ्यांच्या बाजूने उतरत या मुद्दय़ावर आवाज उठविला. काँग्रेसचे नाना पटोले हे या आंदोलनात सहभागी झाले.
अधिक वाचा : पुण्यात सतरंजीमुळे वाचले तरुणीचे प्राण
स्पर्धा परीक्षार्थींनी केलेल्या आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर सहभागी झाले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2025 पासून बदल करण्याची सकारात्मक भूमिका घेतली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावित बदल 2025 पासून लागू करण्याची आयोगाला विनंती केली. त्यानंतर स्पर्धा परीक्षार्थींच्या दुसऱ्या गटाने 2023 पासूनच बदल लागू करण्याची मागणी केली. त्यामुळे एकूणच या मुद्दय़ावर सध्या संभ्रमाची स्थिती असून, विद्यार्थ्यांमध्येही दोन गट पडल्याचे दिसत आहे. त्यात या सगळय़ाला राजकीय वळण लागले आहे. त्यामुळे निर्णय होणे अवघड बनले आहे. यात सर्वसामान्य विद्यार्थी मात्र, नाहक भरडला जात असल्याची खंत एका विद्यार्थ्याने व्यक्त केली.








