पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या गट-क सेवा मुख्य परीक्षेतील टंकलेखन कौशल्य चाचणीत उमेदवारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागल्याने टंकलेखन कौशल्य चाचणी नव्याने आयोजित करण्याची वेळ एमपीएससीवर आली आहे.
गट-क सेवा मुख्य परीक्षेतील टंकलेखन कौशल्य चाचणी मागच्या 7 एप्रिलला घेण्यात आली होती. मात्र, त्या वेळी उमेदवारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले होते. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर ही चाचणी आता नव्याने घेण्यात येणार आहे.
टंकलेखन कौशल्य चाचणीला उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी नव्याने आयोजित करण्यात येईल. चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांना सूचना नव्याने प्रसिद्ध केल्या जातील. या चाचणीला अनुपस्थित उमेदवारांचा अथवा चाचणीमध्ये अपात्र उमेदवारांचा निवड प्रक्रियेसाठी विचार करण्यात येणार नाही. ही टंकलेखन कौशल्य चाचणी फक्त मुंबई येथे आयोजित करण्यात येईल. चाचणीचा दिनांक आणि वेळ स्वतंत्रपणे कळवण्यात येईल, अशी माहिती एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.







