पुणे / प्रतिनिधी :
एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून गुरुवारी केली. त्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. या घोषणेनंतर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.
उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत आहे, असे आयोगाने यासंदर्भात ट्विट करीत म्हटले आहे. त्यामुळे हा तिढा अखेर सुटला असून, विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याची भूमिका घेतली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर एमपीएससीने नवा अभ्यासक्रम तयार केला असून, परीक्षा पद्धतीतही बदल करण्यात आला आहे. हा बदललेला अभ्यासक्रम व वर्णनात्मक स्वरूपाची परीक्षा पद्धत यंदापासून सुरू करण्याचा आयोगाचा मानस होता. त्यास विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केला होता. नवीन अभ्यासक्रम या वर्षीऐवजी 2025 पासून लागू करावा, अशी मागणी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली होती. यासाठी पुण्यात गेल्या तीन दिवसांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले होते. रात्रीच्या वेळेस हातात टॉर्च घेऊन विद्यार्थी पुण्यातील बालगंधर्व चौकात रस्त्यावर ठाण मांडून होते. आमचा अभ्यासक्रमाला विरोध नाही, फक्त तयारीसाठी वेळ हवा, अशी त्यांची मागणी होती. विरोधी पक्षांनीही विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती.
अधिक वाचा : भारत सरकारने कोल्हापुरच्या जवानाला केले ‘पळपुटा’ घोषित
आंदोलकांचा लढा, सर्वपक्षीयांची साथ अन् विद्यार्थ्यांना दिलासा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: विद्यार्थ्यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या एका गटाने आंदोलन मागे घेतले होते. मात्र, दुसरा गट आंदोलनावर ठाम होता. दुसरीकडे काँग्रेसनेही याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे सरकार दरबारी वेगाने हालचाली सुरू झाल्या होत्या. राज्य लोकसेवा आयोगाला पत्र पाठवण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. तर आयोगाने कोणतीही भूमिका न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर आयोगाने सकारात्मक निर्णय घेत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. दरम्यान, आयोगाच्या निर्णयाबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
आता जोमाने तयारीला लागा : शरद पवार यांच्याकडून शुभेच्छा
आयोगाच्या निर्णयाबद्दल पवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तुम्ही पेलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भविष्यात भरीव योगदान द्याल, असा विश्वास व्यक्त करतानाच पवार यांनी पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.







