ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 30 एप्रिलला होणाऱ्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेची हॉल तिकीट लीक झाली आहेत. टेलिग्रामवर व्हायरल झालेल्या लिंकवर 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट दिसून येत आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या डेटा सिक्युरिटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एमपीएससीकडून दोन दिवसांपूर्वीच या परीक्षांचे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले. मात्र, हॉल तिकीट दिल्यानंतर सुद्धा टेलिग्रामवर व्हायरल झालेल्या एका लिंकवर सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट पाहायला मिळत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पोर्टल लॉगिन, फी फावती, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी आदी माहिती लीक झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे डेटा सेक्युरिटीचा प्रश्न समोर आला आहे.
2023 च्या पूर्व परीक्षेचा पेपर देखील आमच्याकडे उपलब्ध आहे, असा दावा देखील या व्हायरल लिंकवर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आयोगाने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली असून, त्यातील वस्तुस्थिती पडताळणी केली जाईल. पेपर लीक होत नसतात, ते खोटे आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत सायबर पोलीस त्याचा तपास करतील. त्यानंतर सत्यता पडताळून पेपर कधी होणार की ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार हे निश्चित होईल, अशी प्रतिक्रिया आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात यांनी दिली.







