पुणे / प्रतिनिधी :
लिपिक टंकलेखक आणि कर सहायक्क परीक्षेच्या टायपिंग स्किल टेस्टमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या बदलांमुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून, बालगंधर्व चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी आंदोलन सुरु केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने टायपिंग स्किल टेस्ट ही महाराष्ट्र परीक्षा परिषद यांच्या नियमानुसार न घेता अचानक त्यात बदल केले आहेत. ही टेस्ट राज्य परीक्षा परिषद यांच्या नियमानुसार केली पाहिजे. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आम्ही असेच रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
लिपिक टंकलेखक आणि कर सहायक्क या परीक्षेसाठी आयोग जी कौशल्य चाचणी घेणार आहे, त्याची शब्द मर्यादा जास्त आहे. आमची आयोगाला विनंती आहे की, मराठीसाठी 30 साठी शब्दमर्यादा ही 120 ते 130 शब्द आहेत आणि इंग्रजीसाठी 210 ते 230 शब्द आहेत. याप्रमाणेच आयोगाने आमची कौशल्य चाचणी घ्यावी. आयोगाला बदल करण्याचा निश्चितच अधिकार आहे. पण आमच्यावर जर अन्याय होत असेल तर ती मागणी आम्ही कोणाकडे करावी?, असा प्रश्न देखील काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
जीसीसी प्रमाणपत्र आयोगाला लागते. त्यानुसार आयोगाचा 120 ते 130 शब्दांचा पॅसेज असतो. तो आम्हाला 10 मिनिटांमध्ये पूर्ण करावा लागतो. आता आयोगाने जे बदल केले आहेत, ते मराठीसाठी 300 शब्द दिले आहेत, तर 400 शब्द इंग्रजीसाठी आहे. ही शब्दमर्यादा दुपटीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आम्हाला शब्द मर्यादा कमीच पाहिजे. सात दिवसांवर पेपर आलेला असताना जर तुम्ही बदल करत असाल्, तर हे चुकीचे आहे. दुसरे म्हणजे मराठीची चाचणी असताना आम्हाला हिंदीचा की बोर्ड देण्यात आला आहे. अद्याप आयोगाकडून आम्हाला कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. आयोगाच्या वेबसाईटवर मेल केले आहेत. मात्र, अद्याप त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.