तुम्ही जी माहिती स्वत:बद्दल द्याल त्याबद्दल बहुधा प्रश्न विचारले जातात
By : डॉ. संकल्प देशमुख
पुणे : मागच्या भागात आपण स्पर्धा परीक्षेतील मुलाखतीच्या बाबतीतील काही महत्त्वाच्या गैरसमजांचा परामर्श घेतला. आजच्या भागात आपण मुलाखतीच्या टप्प्याबाबत आणखी काही महत्त्वाच्या बाबी पाहूया. स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीच्या बाबतीतील एक प्रचंड मोठी अफवा म्हणजे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर फिरणारे मेसेजेस.
ज्यात असे लिहिलेले असते की IAS परीक्षा मे पूछा गया सवाल, क्या आप ये जानते है? तर हे अशाप्रकारच्या मेसेजमध्ये जे काही प्रश्न असतात ते कधीच MPSC, UPSC च्या पॅनलने विचारलेले नसतात. मग पॅनल नेमके कोणते प्रश्न विचारते? तर तुम्ही जी माहिती स्वत:बद्दल द्याल त्याबद्दल बहुधा प्रश्न विचारले जातात. To Know Yourself स्वत:ला ओळखा, हाच मुलाखतीचा खरा मंत्र असतो.
स्वत:ला ओळखायचं म्हणजे नेमकं काय? पॅनलला आपण आपल्या बद्दलची सर्व माहिती ही फॉर्मच्या किंवा प्रोफाईलच्या माध्यमातून दिलेली असते. आपले शिक्षण, मूळ गाव, आपल्या आवडी निवडी, आपला कामाचा अनुभव इत्यादी माहिती या फॉर्म स्वरूपात पॅनलमधील सर्व सदस्यांकडे असते. त्यामुळे पॅनल आपल्याला यातूनच बरेचसे प्रश्न विचारत असते. स्वत:ला ओळखायचे म्हणजे आपणच आपल्या आणि आपल्या भोवतालच्या माहितीची चांगली तयारी करून मुलाखतीला जायचे असते.
यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आपला तालुका, जिल्हा किंवा आपले गाव देखील. आपण जर आपल्याच जिह्याबद्दल जागरूक नसलो तर सहसा आपले पॅनल समोरील Impression खूप वाईट पडू शकते. आपल्या जिह्यातील तालुके किती, त्याची उत्तर दक्षिण नावे काय, जिह्यातून जाणारे महामार्ग, अभयारण्य, धरणे या भौगोलिक परिस्थितीपासून ते आपल्या भागाचे आमदार, खासदार, पालकमंत्री, सहकारी आणि खासगी साखर कारखाने यांची राजकीय माहिती असणे महत्त्वाचे ठरते आणि त्याच सोबत आपल्या भागाच्या सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक बाबींची देखील चांगली माहिती असणे गरजेचे असते.
उदा. कोल्हापूरच्या उमेदवाराला महालक्ष्मीची कथा, रंकाळ्याचे नाव रंकाळा का असेल, कोल्हापूर नावाची काही आख्यायिका आहे का, छत्रपतींच्या कोल्हापूरच्या आणि साताऱ्याच्या गादीमध्ये काय फरक आहे, विशाळगडाचा, पन्हाळगडाचा इतिहास, बांदल सेनेचा पराक्रम, छत्रपती शाहू महाराजांचे महाराष्ट्राच्या प्रशासन, समाज जीवन आणि संस्कृतीमध्ये असणारे योगदान, इथल्या महत्त्वाच्या शिक्षण संस्था, कोल्हापूर जिह्याचे बाललिंग गुणोत्तर किती आहे, कोल्हापूरमधील फुटबॉल आणि कुस्तीची परंपरा, खेळाडू, महत्त्वाची व्यक्तिमत्वे याची देखील माहिती आपल्याला असावी लागते.
प्रश्नांचे आकलन महत्त्वाचे
वरील बाबींच्या सोबतच आपल्या जिह्याशी संबंधित समाज माध्यमात आणि राष्ट्रीय मीडियाने दखल घेतलेला एखादा चालू घडामोडीचा मुद्दा देखील खूपदा सहज मुलाखतीमध्ये विचारला जातो. उदा. कोल्हापूर, सांगली भागात मागच्या काही वर्षात आलेले पूर, त्याचा इतिहास, त्याची कारणे, अलमट्टी धरणाबद्दलची माहिती विचारली जातेच.
याच अनुषंगाने तुम्ही जिल्हाधिकारी असाल, पोलीस अधीक्षक असाल किंवा इतर अधिकारी पदावर असाल तर तुम्ही पूरपरिस्थिती कशी हाताळाल असा केस स्टडी वजा प्रश्न देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच सोबत मध्यंतरी चर्चेत आलेला प्राडा कंपनी आणि कोल्हापुरी चप्पल हा विषय, त्यानिमित्ताने कोल्हापुरी चपलेचा इतिहास, या चपलेचे प्रकार, तिची उत्पत्ती, GI Tag म्हणजे काय असते इत्यादी प्रश्न विचारले जाणे स्वाभाविक आहे. यालाच अनुसरून तुम्हाला कोल्हापुरी चप्पल बनवणपाऱ्या कारागिरांच्या समस्या आणि त्यावर तुम्ही कोणते उपाय सुचवाल अशा प्रकारचा प्रश्न येणे अपेक्षितच असते.
वरती चर्चा केलेले सर्व प्रश्न राज्यसेवेच्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत. यातून एक लक्षात येईल की या प्रश्नांचा अंदाज आपण मुलाखतीआधी बांधणे शक्य तर आहेच पण ‘तरुण भारत’सारखे एखादे चांगल्या दर्जाचे वृत्तपत्र तुम्ही पदवी पासून कायम दित्त्दै करत असाल तर तुम्हाला या प्रश्नांची तयारी करणे आणि आत्मविश्वासाने उत्तरे देणे सहज शक्य देखील आहे. पंतप्रधान मोदीजी म्हणतात त्याप्रमाणे Not only Global, But be vocal for local म्हणजेच जगाची माहिती घेण्याआधी आपण पण आपला परिसर आणि भोवताल छानपैकी जाणून घेऊ.








