बेळगाव : सुळेभावी रेल्वेस्थानकानजीक रोड अंडरब्रिजमधून ये-जा करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. पिकाची वाहतूक करता येत नसल्याने शेतकऱ्यांनी आपली नाराजी खासदारांकडे व्यक्त केली होती. त्यामुळे शुक्रवारी खासदार जगदीश शेट्टर यांनी रोड अंडरब्रिज परिसराची पाहणी करून तेथील अडचणी जाणून घेतल्या. नैर्त्रुत्य रेल्वेने सुळेभावी रेल्वेस्थानकाजवळ रोड अंडरब्रिज बांधला आहे. रेल्वे रस्त्याच्या खालून गेलेला हा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने शेती मालाची वाहतूक करताना अडथळा येत आहे. सुळेभावी, खणगाव तसेच परिसरातील शेतकऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. रेल्वे रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी हा एकच ब्रिज असल्याने वेळोवेळी आंदोलने केली जात आहेत.
समस्या सोडविण्यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने पर्याय शोधावा
या सर्वाची दखल घेऊन खासदार जगदीश शेट्टर यांनी या परिसराची पाहणी केली. त्यांच्यासोबत नैर्त्रुत्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तसेच इंजिनिअर्स उपस्थित होते. शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने पर्याय शोधावा, अशा सूचना करण्यात आल्या.
घटप्रभा येथील नागरिकांना नोटिसा
घटप्रभा रेल्वे स्थानकाजवळ राहणारी कुटुंबे अनेक वर्षांपासून याठिकाणी आहेत. परंतु ही जागा रेल्वे खात्याच्या मालकीची असल्याचे सांगून नोटिसा दिल्या जात असल्याची तक्रार घटप्रभा येथील नागरिकांनी केली. तसेच लवकर या जागेचा ताबा रेल्वेकडे द्यावा, असे आदेश बजावले जात आहेत. या संदर्भात खासदारांनी समस्या जाणून घेत रेल्वे अधिकाऱ्यांना नोटिसा न देण्याची सूचना केली.









