कंत्राटदाराची झाडाझडती : रेल्वेस्थानकाची केली पाहणी
बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकातील फूटओव्हर ब्रिजचे काम संथगतीने सुरू असल्याने खासदार जगदीश शेट्टर यांनी कंत्राटदाराला खडसावले. इतर रेल्वेस्थानकांवर गतीने कामे सुरू असताना बेळगावमध्येच कामाला उशीर का होत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नागरिकांची गैरसोय होत असल्याने लवकरात लवकर ब्रिजचे काम पूर्ण करावे, अशी सूचना खासदारांनी केली. खासदार जगदीश शेट्टर यांनी मंगळवारी बेळगाव रेल्वेस्थानकातील विकासकामांची पाहणी केली. मागील सात ते आठ महिन्यांपासून रेल्वेस्थानकातील फूटओव्हर ब्रिजचे काम सुरू आहे. सध्या हे काम संथगतीने सुरू असल्याची तक्रार काही रेल्वे प्रवाशांनी केली.
यामुळे खासदारांनी कंत्राटदाराला चांगलेच धारेवर धरले. ब्रिजच्या कामाला विलंब का होत आहे, तसेच हा ब्रिज केव्हापर्यंत पूर्ण होईल? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्याने थातूरमातूर उत्तरे दिल्याने खासदार आणखी संतापले. डिसेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे कंत्राटदार कंपनीकडून सांगण्यात आले. जुना फूटओव्हर ब्रिज काढल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून वयोवृद्ध व दिव्यांगांना त्रास होत आहे, असे ते म्हणाले. यावेळी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, नगरसेवक श्रेयस नाकाडी, राजशेखर डोणी यांसह रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
बेंगळूर-बेळगाव एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म एक वर आणा
फूटओव्हर ब्रिज नसल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यातच रेल्वे अधिकारी बेंगळूर-बेळगाव एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्र. 2 वर आणत आहेत. यामुळे बरेच प्रवाशी थेट रेल्वेरुळावर उतरून जिवघेणा प्रवास करीत असल्याने धोका निर्माण झाल्याचे निवेदन बेळगावमधील रेल्वे प्रवाशांनी खासदारांना देत महत्त्वाच्या एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्र. 1 वर आणण्याची मागणी केली.









