पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर शरसंधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मध्यप्रदेशात भाजपसाठी प्रचार केला आहे. येथील सिवनी येथे जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी मध्यप्रदेशचा निरंतर विकास व्हावा, राज्याला सातत्यपूर्ण सुशासन मिळावे असे म्हणत काँग्रेस आणि कमलनाथ यांच्यावर शरसंधान केले आहे.
महाकौशलने भाजपला वारंवार आशीर्वाद दिला आहे. यावेळीही महाकौशलने भाजपचा महाविजय निश्चित केला आहे. सभेतील हे दृश्य भाजपला विजयी करण्याची जनता-जनार्दनाची गॅरंटी आहे. ही विजयाची गॅरंटी असल्याचा दावा मोदींनी केला आहे.
‘भाजप आहे, तर भरवसा आहे, भाजप आहे तर विकास आहे, भाजप आहे तर उज्ज्वल भविष्य आहे’ असे मध्यप्रदेश एक सुरात म्हणत आहे. ‘एमपी के मन में बसे मोदी, मोदी के मन में बसे एमपी, इसलिए फिर एक बार भाजप सरकार’ असे मोदींनी सभेत म्हटले आहे.
पुढील 5 वर्षांपर्यंत मिळणार मोफत धान्य
विजय काय असतो हे या सभेत आल्यावर दिसून येईल. 30 वर्षांनंतर कुठलाही पंतप्रधान येथे आला आणि हे सौभाग्य देखील मलाच मिळाले. कोरोना काळापासुन आतापर्यंत आम्ही 80 कोटी लोकांना मोफत धान्य पुरविले आहे. मध्यप्रदेशात सुमारे 5 कोटी लोकांना मोफत धान्याची सुविधा दिली. ही योजना गरीबांसाठी असल्याने आणखी 5 वर्षे राबविली जाणार आहे. मध्यप्रदेशच्या मनात मोदी का आहे याचे उदाहरण पंतप्रधान अन्न योजना असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
काँग्रेसवर साधला निशाणा
2014 पूर्वी लाख कोटी रुपयांचे घोटाळे व्हायचे. आता भाजप सरकारच्या काळात घोटाळे होत नाहीत. गरीबांच्या हक्काचा पैसा आम्ही वाचविला असून तो आता गरीबांकरताच खर्च होत आहे. घोटाळेबाज काँग्रेस सरकार आणि भाजप सरकारमध्ये हाच मोठा फरक आहे. मध्यप्रदेशात काँग्रेस निवडणूक लढवत नाही. कुणाचा मुलगा काँग्रेसचा प्रमुख होणार याकरता निवडणूक लढविली जात आहे. येथील काँग्रेसचे नेते स्वत:च्या मुलांना सेट करण्यात व्यग्र असल्याने त्यांना जनतेचाच विसर पडला आहे. काँग्रेसचे नेते स्वत:च्या पुत्रांना सेट करण्याच्या नादात मध्यप्रदेशला अपसेट करत असल्याची टीका मोदींनी केली आहे.
आयुष्मान योजनेचा माताभगिनींना लाभ
आयुष्मान कार्डद्वारे महिला आणि भगिनींना सर्वाधिक लाभ झाला आहे. काँग्रेसच्या शासनकाळात उपचार करणे शक्य नव्हते, परंतु आता सिवनी जिल्ह्यात 300 हून अधिक केंद्रे असल्याने लोकांचे नाते जोडले गेले आहे. लोक याला आयुष्मान आरोग्य मंदिर नाव देत आहेत. भाजपने 10 हजार जनौषधी केंद्रे सुरू केली असून यात दरामध्ये 80 टक्के सवलत मिळते. गरीबांचे जीवन वाचविण्यासाठी मी झटत असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
नवमतदारांना खास आवाहन
डबल इंजिन सरकार मातभगिनींसाठी समर्पित आहे. माताभगिनींना त्रास होऊ नये म्हणून शौचालयांची निर्मिती करविली, सिलिंडर पुरविले, वीज सेवेत आमुलाग्र सुधारणा घडवून आणली आणि आता प्रत्येक घरात जल पाहोचविण्याची तयारी सुरू आहे. मध्यप्रदेशला आघाडीचे राज्य करण्यासाठी मिळून काम करू आणि कमळ फुलवुया असे आवाहन मोदींनी नवमतदारांना केले आहे.









