ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करून मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांवर हल्लाबोल करताना दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणतीही काळजी नाही. त्यांनी यावर अद्यापही कोणतेही भाष्य केलं नाही. मणिपूरमध्ये जर बिगर भाजप सरकर असते तर तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली असती. मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यास केंद्र सरकारला यश आल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “मणिपूर हा देशाचा हिस्सा असून तेथील हिंसा रोखण्यास सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. मणिपूर जर इतर पक्षाचं राज्य असतं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, स्मृती इराणी यांची भाषा बदलली असती. भाजपने त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करून सरकार बरखास्त केलं असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूर हिंसाचारप्रकरणी अद्यापही आपली मन की बात देशासमोर ठेवलेली नाही. यावर संसदेत चर्चा होणार असेल तर यात चुकीचं काय? ” असा हल्लाबोल केला.
पुढे बोलताना संजय राऊतांनी, “पूर्ण विश्वाला मणिपूरची चिंता आहे, पण विश्वगुरूला कोणतीच चिंता नाही. राहुल गांधी यांनी साडेचार हजार किलोमीटरची भारत जोडो यात्रा केली आहे. त्यांना लोकांचं समर्थन आहे. देशात अशी हिंचा सुरू असेल तर, लोकांना मारलं जात असले, लोक बेघर होत असतील तर त्यावर देशाचा नेता चिंता व्यक्त करत असेल तर चुकीचं काय?” असा सवाल संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत भाजपला केला.
भाजपविरोधी पक्षाची बैठक १७ आणि १८ जुलैला होत आहे. यावर भाष्य करताना ते म्हणाले, “१७ तारखेला बैठक सुरू होईल. हि बैठक निर्णायक असून अनेक गोष्टी यात ठरवल्या जातील. महाराष्ट्रातून शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि मी जाणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवारही या बैठकीत सहभागी होतील. काँग्रेसने या बैठकीचं आयोजन केल्याने ती बैठक महत्त्वपूर्ण आहे. जागावाटपासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे” असेही ते म्हणाले.