कोल्हापूर; आम्ही काहीही अ व ब केलेल नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत, फक्त गटनेता बदलला पक्षप्रतोदपदी खासदार भावना गवळी यांची पुन्हा नेमणुक केली. यापुर्वी एनडीएचे घटक होतो. जिल्ह्यातील ९०० गावांचा विकास करायचा आहे. आता केंद्रातून आणि राज्यातून निधी मिळेल, त्यामुळे पुन्हा एनडीएत सामील झालो. वेगळा कोणताही राजकीय निर्णय घेतला नसल्याचा खुलासा खासदार संजय मंडलिक यांनी केला. तर खासदार धैर्यशील माने मी कोल्हापुरात आल्यानंतरच बोलेन, असे स्पष्टीकरण यांनी दिले आहे.
खासदार मंडलिक म्हणाले, आम्ही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचे घटक पक्ष म्हणून निवडणुक लढवली आणि निवडूण आलो. आता पुन्हा एनडीएमध्ये सहभागी झालो आहोत. हे करताना आम्ही शिवसेना सोडलेली नाही. राज्यात मुख्यमंत्री बदलला त्यावेळी आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच होतो. त्यांनीही एनडीएसोबत जावे, अशीच भुमिका वारंवार आम्ही घेतली होती. राज्यात अडीच वर्ष शिवसेनेचे सरकार होते. मात्र निधीचा वानवा होता. माझ्यापुरता विचार केला तर उर्वरीत अडीच वर्षात निधी नसताना निवडणुकींना कसं सामोर जायचं हा मोठा प्रश्न होता. मतदारसंघातील नऊशे गावांना निधी आणि विकासाच काय करायचं हा प्रश्न सतावत होता. इच्छा असुनही कोणताही मोठा उद्योगधंदा मतदारसंघात आणू शकलो नाही, ही खंत होती. आता राज्यात आणि केंद्रात आमचंच सरकार असल्याने विकासकामांसाठी मोठा निधी मिळेल हा व्यापक विचार करुन आत्ताचा निर्णय आम्ही घेतला आहे.
कोल्हापुरात आल्यावर भुमिका स्पष्ट करणार; धैर्यशील माने
खासदार धैर्यशील माने यांच्याशीही संपर्क साधला असता त्यांनी कोल्हापुरात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधून भुमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.