खासदार संजय मंडलिक यांची माहिती; आज पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन
कोल्हापूर प्रतिनिधी
कुशल भारत घडविणेसाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत कोल्हापूर लोकसभा मतदार संघामध्ये 15 प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्रांना मंजूरी मिळाली असून नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी 4 वाजता ऑनलाईन पध्दतीने उदघाटन होणार असल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील युवक यवतींना रोजगार क्षेत्रातील उपयुक्त कौशल्य आत्मसात करुन तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी ही कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील आजरा तालुक्यातील आजरा व उत्तुर, चंदगड तालुक्यातील चंदगड व महागांव, भुदरगड तालुक्यातील गारगोटी व मडिलगे बुद्रुक, गडहिंग्लज तालुक्यातील भडगांव व महागांव, गगनबावडा तालुक्यातील गगनबावडा, कागल तालुक्यातील कसबा सांगाव व कापशी, करवीर तालुक्यातील उचगांव, राधानगरी तालुक्यातील राधानगरी व राशिवडे बुद्रुक, तसेच पन्हाळा तालुक्यातील कळे या गावामध्ये ही केंद्रे मंजूर झाली आहेत. ग्रामीण भागातील युवकांचा कौशल्य विकास करुन रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग-धंदा उभारण्यासाठी लागणारी व्यावसायिक तंत्रज्ञान, व्यवस्थापनाचे ही धडे दिले जाणार आहेत. युवकांच्या भविष्याचा विचार करुन कौशल्य रोजगार उद्योजकता मंत्रालयाने ही केंद्रे मंजूर केली आहेत. या कौशल्य विकासाचा युवकांचे उज्वल भविष्य घडण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे. कौशल्य विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना वेगवेगळ्या योजनांतून आर्थिक पाठबळ पुरविण्याचे सरकारचे नियोजन असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले.









