पणजी : भारतीय जनता पक्षाच्या विद्ध्वंसक राजकारणाला पराभूत करण्यासाठी ’आप’ हाच एकमेव पर्याय असल्याचे राज्यसभा खासदार आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. संदीप पाठक सांगितले. काँग्रेस आणि भाजप नकारात्मक राजकारण करीत असून भाजपचे राजकारण सकारात्मक आहे, असेही पाठक म्हणाले. काल दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटर गोवा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. संदीप पाठक बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार क्रूझ सिल्वा, व्हिझी व्हिएगस, गोव्याचे प्रभारी दिपक सिंग्ला, सहप्रभारी चेतन रावळ, प्रदेशाध्यक्ष अॅङ अमित पालेकर व अन्य उपस्थित होते. आपची संघटना मजबूत करण्यासाठी सरचिटणीस डॉ. संदीप पाठक गोव्यात आले असून त्यांनी आपच्या कार्यकर्त्यांशी बैठका घेतल्या आहेत. जनतेकडून आपला चांगला प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आप स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचेही पाठक यांनी सांगिले. आप जनतेसाठी काम करीत असून सकारात्मक राजकारण करीत आहे. म्हणूनच अवघ्या दहा वर्षात आपला राष्ट्रीय पक्ष दर्जा मिळालेले आहे. आजच्या घडीला जनतेचा कौल आपच्या बाजूनेच आहे, असे पाठक म्हणाले.
गेल्या दहा वर्षात आप सरकारने नोकऱ्या निर्माण केल्या. आरोग्य आणि शिक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली आणि सामान्यांचा राहणीमानाचा खर्चही कमी केला. याउलट भाजपने केवळ विद्ध्वंसक राजकारण केले आहे. सामान्य माणसावर कुशासनाचा भार टाकणे असो किंवा विरोधी पक्षांना चिरडण्याचा प्रयत्न असो. हीच कामे केली आहेत. प्रामाणिक राजकारणाचा परिणाम म्हणून ’आप’ने दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार स्थापन केले. गुजरात आणि गोव्यात आमचे आमदार आहेत. अनेकजण प्रस्थापित पक्षांना कंटाळले असून ’आप’कडे आशेचा एक नवीन स्रोत म्हणून पाहत असल्याचे सिद्ध होते. ’आप’ची प्रतिमा खराब करण्यासाठी भाजपचा प्रयत्न चालू असतानाही, ’आप’ दिवसेंदिवस बळकट होत चालले आहे. असेही पाठक म्हणाले. आज अनेक मोठे विरोधी पक्ष आहेत, पण ’आप’ला संपवायला भाजप सर्वात जास्त उत्सुक आहे. त्यांच्या विषारी राजकारणाला आळा घालण्यात फक्त ’आप’च यशस्वी होईल’ याची त्यांना जाणीव आहे. ’आप’ला संपवण्यासाठी ते विविध योजना आखत आहेत. परंतु या देशातील जनतेला माहीत आहे की अरविंद केजरीवाल एक प्रामाणिक माणूस आहे. त्यांना आणि त्यांच्या मंत्र्यांना खोट्या तक्रारीमध्ये फसवून, त्रास देऊन आपला चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला ते माफ करणार नाहीत. असे पाठक यांनी सांगितले मागच्या निवडणुकीत भाजपने बहुमताने विजय मिळवला असला तरी त्यांनी काँग्रेस नेत्यांना विकत घेतले आणि काँग्रेस पक्ष संपवला. औद्योगिक धोरण, आयटी धोरण किंवा रोजगार धोरणावर काम करण्यापेक्षा लोकांना लुटून स्वत:ची संपत्ती कशी वाढवता येईल यावर भाजपचा भर आहे. भाजप जनतेची सेवा करण्यासाठी देशात नाही; तर देशभर सत्ता काबीज करण्यासाठी आहे असा टोला पाठक यांनी लगावला.









