प्राण्यांच्या देखभालीसाठी केल्या विविध सूचना
बेळगाव : चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी रविवारी भुतरामहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. आपल्या या भेटीत खासदारांनी वन्यजीवी संरक्षणासंबंधी वनविभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. खासदार प्रियांका यांचे वडील सतीश जारकीहोळी यांनीही स्वत: पुढाकार घेत प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांची संख्या वाढवण्याबरोबरच त्यांचे जतन करण्यासाठी वनखात्यासोबत उपक्रम राबवले होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत खासदार प्रियांका यांनीही वन्यजीवींबद्दलची आपली आस्था दाखवून दिली आहे. संपूर्ण प्राणीसंग्रहालयाची पाहणी करून वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. प्राणीसंग्रहालयाच्या विकासासाठी आगामी योजनांबद्दलही त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.









