कृष्णात चौगले कोल्हापूर
पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील मरळी गावात खासदार फंडातून रस्ते कामासाठी पाच लाख रूपये मंजूर झाले. त्याची निविदा प्रक्रिया होऊन वर्कऑर्डर झाली. त्यानुसार काम सुरु झाले. पण निम्मे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदेकडून संबंधित ठेकेरादारास काम रद्द केल्याचे फोनवरुन सांगण्यात आले. एकदा वर्कऑर्डर झाल्यानंतर काम रद्द केलेच कसे ? असा सवाल ठेकेदारासह गावातील सरपंचाने उपस्थित केल्यानंतर राज्यसभा खासदारांच्या स्वीय सहाय्यकांनी आपले काम रद्द करून दुसरे काम मंजूर केले असल्याचे संबधित अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. या कामात ठेकेदाराची अडीच ते तीन लाखांची रक्कम खर्च झाली असताना ते रद्द केल्यामुळे त्या खासदारांच्या कार्यपद्धतीचा आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेता कोणताही असो, त्यांच्या आजुबाजूला वावरणारे कार्यकर्ते आणि स्वीय सहाय्यकाच्या (पी.ए.) वर्तनावर जनमाणसात त्याची प्रतिमा तयार होत असते. नेत्याबरोबरच त्याच्या कार्यकर्त्यांचे पाय जमिनीवर असायला हवे, तरच त्या नेत्याला जनाधार मिळतो. मतदारसंघातील जनता मोठय़ा अपेक्षेने एखाद्या नेत्याकडे काम घेऊन गेल्यानंतर ते होईल अथवा नाही. त्याबाबतचे स्पष्टीकरण तो नेता अथवा त्याच्या कारभाऱयांनी देणे अपेक्षित असते. तरच त्याची आगामी राजकीय वाटचाल सुलभ ठरते. अन्यथा स्वीय सहाय्यक अथवा कार्यकर्त्यांच्या पापाचे खापर नेत्याच्या माथ्यावर फुटल्याशिवाय राहत नाही.
जिह्यात लोकसभा मतदारसंघातून निवडूण आलेले दोन खासदार आणि एक राज्यसभेचे खासदार आहेत. यापैकी एक वैभवशाली खासदारांकडे स्वीय सहाय्यकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला खासदारांना भेटायचे झाल्यास सुरुवातीस त्यांना मुजरा करावा लागतो. तरीही खासदारांची भेट होईल की नाही हे निश्चित नसते. जिह्यातील कोणत्या गावातील विकासकामांना मंजूरी द्यायची याबाबतचे अधिकार देखील काही पीएंना दिले आहेत. त्यांच्याकडून ‘लक्ष्मीदर्शन’ घेऊन ही कामे मंजूर केली जातात. ज्या गावातील पदाधिकारी अथवा ठेकेदाराकडून अर्थपूर्ण सोय होते, त्यांचींच कामे मंजूर केली जातात. विशेष बाब म्हणजे एखादे काम मंजूर केल्यानंतर, त्या कामांची वर्कऑर्डर निघाल्यानंतरही दुसरीकडून अधिक लाभ मिळाल्यास पहिले काम रद्द केल्याच्या काही घटना आहेत.
पीएची करामत, अन् वर्कऑर्डरनंतरही काम झाले रद्द
मरळी गावांत रस्ते कामासाठी खासदारांच्या हिश्शातील जनसुविधा निधीतून पाच लाख रूपयांचे काम मंजूर करण्यात आले. जिल्हा परिषदेकडून या कामाच्या निविदेपासून वर्कऑर्डरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने काम गतीने सुरु केले. रस्त्याचे निम्मे काम पुर्ण झाल्यानंतर त्यांना सदरचे काम रद्द झाल्याबाबत जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले. याबाबत जि.प.मध्ये चौकशी केली असता खासदारांच्या पीएंनी आपले काम रद्द करून दुसरे काम सुचवले असल्याचे संबंधित अधिकाऱयांनी सांगितले. परिणामी रस्त्याच्या झालेल्या कामाचा देखील निधी देता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत न्याय मागण्यासाठी संबंधित ठेकेदाराने त्या खासदारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण संबंधित पीएंनी त्याला त्यांच्यापर्यंत पोहचू दिले नाही. या सर्व घडामोडींमुळे स्वतःचे पैसे विकासकामांवर खर्च केलेल्या ठेकेदारास मोठा धक्का बसला आहे. हे काम एक सुशिक्षित बेकार अभियंत्याने घेतले असून बांधकाम क्षेत्रातील त्याची सुरुवात आहे. पण या सर्व घडामोडींमुळे प्रारंभीच त्याला मानसिक धक्का बसला आहे. झालेल्या कामाचे अडीच ते तीन लाख रूपये कोण देणार ? असा सवाल त्याच्याकडून उपस्थित केला जात आहे.
खासदार अनभिज्ञ, स्वीय सहाय्यकांना लगाम लावण्याची गरज
स्वीय सहाय्यकाच्या करामतीमुळे संबंधित खासदार जिह्यात बदनाम होण्याची वेळ आली आहे. स्वतः चारित्र्य संपन्न असून देखील केवळ पीएंच्या बेलगाम वागण्यामुळे जनतेमध्ये त्या खासदाराची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे त्या खासदारांनी वेळीच सावध होऊन पीए बरोबरच आपल्या भोवतालच्या कारभाऱयांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.









