जबरदस्तीने मंदिर प्रवेश केल्याबद्दल एफआयआर दाखल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
झारखंडमधील गोठ्ठा मतदारसंघाचे खासदार निशिकांत दुबे त्यांच्या समर्थकांसह शनिवारी देवघर येथील बैद्यनाथ धाम मंदिर पोलीस ठाण्यात पोहोचले. अलिकडेच त्यांच्याविरोधात नोंदवलेल्या गुह्याच्या निषेधार्थ आत्मसमर्पण करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. मंदिर परिसरात जबरदस्तीने प्रवेश केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पूर्णपणे निराधार असल्याचा दावा त्यांनी केला. श्रावणी मेळाव्यात बाबा बैद्यनाथ मंदिरात जबरदस्तीने प्रवेश केल्याबद्दल आणि जल अर्पण केल्याबद्दल गो•ाचे खासदार निशिकांत दुबे आणि दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांच्यासह पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात पोहोचण्यापूर्वी विमानतळावर दुबे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपल्यावर झालेले आरोप हे राजकीय कटाचा भाग आहे. काही राजकीय विरोधक आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले. वैद्यनाथ धाम पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतरही पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. यावर दुबे म्हणाले की आता हा लढा मी सभागृहात घेऊन जाईन. त्यांनी देवघरच्या एसपी, डीसी आणि डीजीपींविरुद्ध लोकसभेत विशेषाधिकार उल्लंघन प्रस्ताव आणणार असल्याचेही सांगितले. या घटनेमुळे झारखंडच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला असून हा मुद्दा आता दिल्लीतील संसद भवनापर्यंत पोहोचणार आहे.









