युवा समितीच्या पत्राला दिला प्रतिसाद
बेळगाव : बेळगावसह संपूर्ण सीमाभागात कर्नाटक सरकारकडून कन्नडसक्ती लादली जात आहे. याविरोधात मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठी सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा काढला जाणार असून या मोर्चाला महाराष्ट्रातील खासदार निलेश लंके यांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्याचबरोबर कन्नड सक्तीबाबत लोकसभेत आवाज उठविण्याचे आश्वासन त्यांनी पत्राद्वारे दिले आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी दोन दिवसांपूर्वी खासदार निलेश लंके यांना पत्र पाठविले होते. कर्नाटक सरकारकडून सुरू असलेल्या कन्नड सक्तीविरोधात लोकसभेत आवाज उठवावा, अशी मागणी त्यांनी लंके यांच्याकडे केली होती. या पत्राची दखल घेऊन युवा समितीला खासदार लंके यांनी पत्र पाठविले आहे.
1956 पासून बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक आपल्या न्याय्य हक्कांसाठी न्यायालयीन तसेच रस्त्यावरील लढा देत आहेत. सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाचा निकाल प्रलंबित आहे. अशा परिस्थितीतही भाषिक सक्ती कर्नाटक सरकारकडून केली जात आहे. मराठी भाषिकांनी आजवर आपली भाषा आणि संस्कृती जपली असून 11 ऑगस्ट रोजी निघणाऱ्या महामोर्चाला जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्र खासदार लंके यांनी पाठविले आहे.









