सुळकुड पाणीयोजनेसाठी जिल्हयातील दोन तालुके आमने सामने
इचलकरंजीसाठी महत्वाची असलेली सुळकूड पाणी योजना अंतिम टप्प्यात असताना काही गैरसमज झाले आहेत. पाण्याला कोणीच नाही म्हणत नाही. ही आपली संस्कृती आहे. जर कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईन योजनेतून पाणीपुरवठा होऊ शकतो तर मग इचलकरंजी काय पाकिस्तानात आहे का? असा सवाल खासदार धैर्यशील माने यांनी केला आहे. ते आज सुळकूड अंमलबजावनी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत बोलत होते.या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला.
दूधगंगा नदीवरील सुळकुड पाणी योजनेवरून गेल्या अनेक दिवसापासून मोठा वाद सुरु आहे. इचलकरंजी शहरासाठी सुळकूडवरून राखीव पाणीपुरवठा देण्याच्या योजनेला मान्यता मिळाली आहे. मात्र कागल तालुक्यातील नागरिकांचा या योजनेला तीव्र विरोध होत आहे. यामुळे कोल्हापूर शहरातील दोन तालुके एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सुळकूड पाणी योजनेला स्थगिती द्यावी यासाठी दोन दिवसापूर्वी कागल मधील सर्व नेत्यांकडून जिल्हाधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेण्यात आली होती. तसेच या योजनेला स्थगिती द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच इचलकरंजीकरांनी आमच्याकडे पाणी मागायला येऊ नये असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी खडसावून सांगितले होते. यामुळे इचलकरंजी शहरातील नागरिकांनी आता तरी सर्व नेत्यांनी एकत्र यावे असे म्हणत संताप व्यक्त केला होता. यामुळे आज सुळकूड योजना अंमलबजावणी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे सोबत आढावा बैठक घेण्यात आला या बैठकीला खास. धर्यशील माने,माजी खास.राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवनकर, राहुल आव्हाडे, राजीव आवळे, प्रताप होगाडे उपस्थित होते.
पाणी योजनेला कोणत्याही प्रकारे स्थगिती देण्यात येऊ नये यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना खा. धर्यशील माने यांनी सुळकुड योजना अंतिम टप्प्यात आल्यानंतर काही जणांचे गैरसमज होत आहेत, कागलकरांचे एक थेंबाचे ही या योजनामुळे नुकसान होणार नाही जर कोल्हापूरला थेट पाईपलाईन मधून पाणीपुरवठा करता येतो. मग इचलकरंजी कुठे पाकिस्तानात आहे का? असा सवाल धैर्यशील माने यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना केला. दरम्यान राजू शेट्टी यांनी ही पंचगंगा नदी शहराच्या उशाला असताना थेट पाईपलाईन मधून पुरवठा होतो तर मग इचलकरंजीला सुळकूड मधून का नाही होऊ शकत? सत्तेचा वापर करत मंजूर असलेल्या योजनेला स्थगिती देण्याचे काम सुरु असल्याची टीका ही राजू शेट्टी यांनी यावेळी केली आहे.









