सीबीआयचे पथक प्रतीक्षेत : आई आजारी असल्याचे दिले कारण : समर्थकांनी रोखले रस्ते
वृत्तसंस्था/ तिरुपति
आंध्रप्रदेशात कडप्पाचे वायएसआर काँग्रेसचे खासदार वाय.एस. अविनाश रेड्डी यांनी अटकेपासून वाचण्यासाठी 5 दिवसांपासून कुरनूल येथील एका खासगी रुग्णालयात आश्रय घेतला आहे. सीबीआयचे पथक खासदार बाहेर पडल्याक्षणी अटकेची कारवाई करणार आहे.
सीबीआयने 19 मे रोजी खासदार अविनाश रेड्डी यांना चौकशीसाठी बोलाविले होते. परंतु अविनाश यांनी आई आजारी असून तिला भेटण्यासाठी रुग्णालयात जात असल्याचे कारण सीबीआयला दिले होते. हे रुग्णालय खासदाराच्या निकटवर्तीयाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयात दाखल झालेले खासदार अविनाश हे मागील 5 दिवसांपासून बाहेरच पडलेले नाहीत. तर अनिवाश रेड्डीयांच्या शेकडो समर्थकांनी रुग्णालयाच्या दिशेने जाणारे रस्ते रोखून धरले आहेत. अविनाश यांच्यावर माजी खासदार आणि त्यांचे काका वाय.एस. विवेकानंद रेड्डी यांची हत्या केल्याचा आरोप आहे. सीबीआय याप्रकरणी 2020 पासून तपास करत आहे.

अविनाश यांना हैदराबादमध्ये चौकशीसाठी सीबीआय पथकावर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. कडप्पाचे खासदार स्वत:च्या सहकाऱ्यांसोबत रुग्णालयातील एका खोलीत बैठका घेत आहेत. सीबीआयने 16-22 मेदरम्यान रेड्डी यांना तीनवेळा समन्स बजावला होता, परंतु ते हजर न झाल्याने सीबीआयने त्यांना ताब्यात घेण्यासाठी 22 मे रोजी कुरनूल येथे पथक पाठविले होते.
4 वेळा चौकशी
सीबीआयने कडप्पा खासदाराची यापूर्वी चारवेळा चौकशी केली आहे. खासदाराने मागील महिन्यात अंतरिम जामिनासाठी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 5 जूनपर्यंत स्थगित केली आहे. याप्रकरणी कुठलेच कठोर पाऊल उचलण्यापासून सीबीआयला रोखण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
2019 मध्ये माजी खासदाराची हत्या
विवेकानंद रेड्डी यांची निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी 15 मार्च 2019 रोजी पुलिवेंदुला येथील त्यांच्या निवासस्थानीच हत्या करण्यात आली होती. राज्याचे 68 वर्षीय माजी मंत्री आणि माजी खासदार स्वत:च्या घरात एकटे असताना अज्ञात हल्लेखोरांनी घरात शिरून त्यांची हत्या केली होती. विवेकानंद रेड्डी आणि अविनाश रेड्डी हे पस्परांचे नातेवाईक आहेत.
मुलीकडून न्यायालयात याचिका
विवेकानंद रे•ाr यांची कन्या सुनीता यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करत आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने सीबीआयला याप्रकरणाची चौकशी सोपविण्याचा निर्देश 2020 मध्ये दिला होता. सुनीता रे•ाr यांच्या याचिकेवर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी हैदराबाद येथील न्यायालयात स्थानांतरित केली होती.
अविनाश रेड्डीच्या वडिलांना अटक
मागील महिन्यात सीबीआयने अविनाश रेड्डी यांचे वडिल वाय.एस. भास्कर रेड्डी यांना अटक केली होती. भास्कर रेड्डी, अविनाश रेड्डी आणि त्यांचे समर्थक देवीरेड्डीशिवशंकर रेड्डीयांनी विवेकानंद यांच्या हत्येचा कट रचला होता, अविनाश रेड्डी यांना कडप्पा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यास विरोध केल्याने ही हत्या करण्यात आल्याचा दावा सीबीआयने केला आहे. अविनाश रेड्डी यांनी स्वत:वरील तसेच वडिलांवरी आरोप फेटाळले आहेत.









