दोन दिवसांसाठी कोठडी पॅरोल मंजूर : दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील खासदार आणि अवामी इत्तेहाद पार्टीचे (एआयपी) प्रमुख इंजिनियर रशीद यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार इंजिनिअर रशीद आता संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहू शकतील. fिदल्ली उच्च न्यायालयाने त्यांना दोन दिवसांचा कोठडी पॅरोल मंजूर केला आहे. त्यामुळे आता 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत ते पॅरोलवर असतील. अलिकडेच रशीद यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी कस्टडी पॅरोल मिळावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याला अनुसरून न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. ते टेरर फंडिंग प्रकरणात सध्या तिहार तुरुंगात बंदिस्त आहेत.
खासदार इंजिनियर रशीद यांना संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्याची परवानगी देताना दिल्ली उच्च न्यायालयाने अनेक अटीही घातल्या आहेत. त्यांना कोठडीच्या पॅरोल दरम्यान माध्यमांशी बोलण्यास मनाई असेल. त्याशिवाय, मोबाईल फोन आणि इंटरनेटचा वापर करता येणार नाही. या संपूर्ण घटनेवर इंजिनियर रशीद यांचा मुलगा अबरार रशीद याची प्रतिक्रियाही समोर आली आहे. अबरार रशीद याने या निर्णयाला सकारात्मक पवित्रा असे म्हटले. लोकसभा निवडणुकीत इंजिनियर रशीद यांना मोठा जनादेश मिळाल्यामुळे ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. परंतु गेल्या तीन अधिवेशनांत न्यायालयाची परवानगी न मिळाल्यामुळे ते संसद अधिवेशनात भाग घेऊ शकले नव्हते.
इंजिनियर रशीद युएपीए अंतर्गत दाखल झालेल्या दहशतवादी फंडिंग प्रकरणात अटकेत आहेत. 2017 च्या दहशतवादी निधी प्रकरणात बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत एनआयएने त्यांना अटक केली होती. ते 2019 पासून तिहार तुरुंगात आहेत. इंजिनियर रशीद यांनी तुरुंगात असताना निवडणूक लढवली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामुल्ला मतदारसंघातून निवडून आले होते.
कस्टडी पॅरोलला एनआयएचा विरोध
न्यायालयात केंद्रीय एजन्सी एनआयएने इंजिनियर रशीद यांच्या कस्टडी पॅरोलची मागणी करणाऱ्या याचिकेला विरोध केला. संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी त्यांना कस्टडी पॅरोल मागण्याचा कोणताही अधिकार नाही, असा युक्तिवाद एनआयएने केला. तथापि, उच्च न्यायालयाने एएनआयचा युक्तिवाद मान्य न करता रशीद यांना कस्टडी पॅरोल मंजूर केला.









