पुणे / प्रतिनिधी :
उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीतील सहकाऱ्यांच्या शपथविधीला उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल काल्हे यांनी यासंदर्भात खुलासा केला असून, मी शरद पवारसाहेबांसोबतच असल्याचे कोल्हे सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादीचे नेते डॉ. अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत कोल्हे यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर मात केली होती. भारदस्त व्यक्तिमत्त्व व उत्तम वक्तृत्व असलेले कोल्हे यांच्या भाजपाप्रवेशाची मागच्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या भेटीनंतर या चर्चेला अधिकच जोर चढला होता. मात्र, आपण राष्ट्रवादीत राहणार असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले होते. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून त्यांनी आपली उमेदवारीही पक्की करून घेतली होती.
डॉ. कोल्हे व अजित पवार यांचे तितकेसे जमत नसल्याचे वेळोवेळी पहायला मिळाले आहे. मध्यंतरी एका मुलाखतीत कोल्हे यांनी आपल्याला मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटीलच अधिक योग्य वाटत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शपथविधीच्या कार्यक्रमात ते दिसल्यानंतर राजकीय वर्तुळातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र, कोल्हे यांनी शरद पवारांसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने पवार समर्थकांना दिलासा मिळाला आहे.
यासंदर्भात बोलताना कोल्हे म्हणाले, मी अजितदादांसोबत वेगळय़ा विषयावर चर्चा करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा बऱ्याच उशिरा मला कळाले, की शपथविधी होत आहे. त्यानंतर मी कार्यालयाशी संपर्क साधला. अशा प्रकारचे राजकारण असेल, तर माझ्यासारख्या राजकीय पार्श्वभूमीवर व्यक्तीला राजकारणात राहण्यात अजिबात स्वारस्य नाही, असे मी पवारसाहेबांना सांगितले. त्यावर पवारसाहेबांनी आपण उद्या भेटू, यावर चर्चा करू, असे सांगितले.
शिवरायांच्या भूमीत नैतिकता पाळले पाहिजे
खरे तर राजकारणात नीती मूल्यांना महत्त्व दिले पाहिजे. उत्तरदायीत्व, जबाबदारी, नैतिकतेला मी तरी महत्त्व देतो. त्यामुळे राजीनाम्याचीही तयारी ठेवली होती. नैतिकतेला सोडून मी जाऊ शकत नाही. म्हणूनच मी पवार साहेबांसोबतच राहणार आहे. आपण लोकांचे मुद्दे मांडतो. अचानक अशी भूमिका घेण्याचे कारण काय? याने महागाई कमी होणार आहे काय? याचा विचार केला पाहिजे. पदाच्या मोहातून मला काही करायचे नाही. माझा आतला आवाज सांगणे गरजेचे आहे, असे वाटलं. यासाठीच मी हा निर्णय जाहीर केला असल्याचे डॉ. कोल्हे यांनी नमूद केले. आपण शिवरायांच्या, शंभूराजेंच्या भूमीत राहत आहोत. त्यामुळे नैतिकता पाळली पाहिजे, असेही डॉ. कोल्हे यांनी बंडखोरांना सुनावले.








