गैरप्रकार होत असेल तर मुंबईत बैठक लावू : खासदार धनंजय महाडिक यांचा महापालिका आढावा बैठकीत इशारा
प्रतिनिधी/कोल्हापूर
महापालिकेत गैरप्रकार आणि कामात हयगय होत असेल मुंबईत बैठक लावली जाईल. त्यामध्ये दोषी आढळल्यास कारवाई होईल. सरकार बदलले आहे हे डोक्यात ठेवा असा इशारा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिला.
कोल्हापूर शहरातील प्रलंबित प्रकल्प आणि नवीन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी खासदार महाडिक यांनी शनिवारी प्रथमच महापालिकेत बैठक घेतली. बैठकीला प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी आणि भाजप- ताराराणी आघाडीचे माजी नगरसेवक उपस्थित होते.
जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी पाणीपुरवठ्य़ा संदर्भातील माहिती सादर केली. अमृत योजनेतील 60 टक्के काम झाल्याचे सांगितले. तसेच नवीन एसटीपी आणि मल्लनिसारणासाठी डीपीआर तयार करण्यात येत आहे. अमृत योजनेतील कामाला मार्च 2023 मध्ये मुदतवाढ दिल्याची माहिती दिली. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी माजी आमदार अमल महाडिक यांच्या काळात मंजूर झालेले हे काम असून अद्याप प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिले.
विजय सूर्यवंशी म्हणाले, अमृत योजना दोनमधून रस्ते आणि गटारीची कामे व्हावीत. यावर खासदार महाडिक यांनी अमृत योजना दोनचे सर्व्हेक्षण तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. जलअअभियंता घाटगे यांनी रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी दहा कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये नाल्यातून तलावात मिसळणारे सांडपाणी, जलपर्णी होऊ नये यासाठी उपाय आणि पाण्याची गुणवत्ता सुधारणे अशी कामे करण्यात येणार असल्याचे सांगितले.
हे ही वाचा : अवैध होर्डिंगचा महापालिकेला कोट्य़वधींचा चुना
शहरातील कचऱ्यासंदर्भात सुनिल कदम, सत्यजित कदम, रुपाराणी निकम, किरण नकाते, अजित ठाणेकर यांनी तक्रार केली. प्रक्रिया होत नसल्याने झूम प्रकल्पावर कचऱयाचे डोंगर झाल्याचे सांगितले. यावेळी महापालिकेचे अधिकारी विजय पाटील यांनी तांत्रिक माहिती देत चार लाख घनमीटर कचरा होता. त्यापैकी अडीच लाख घनमीटर कचऱयावर प्रक्रिया झाली असून उर्वरित कचऱ्यावर मे 2023 प्रक्रिया करण्यात येणार आहे असे स्पष्ट केले.
सहायक आयुक्त औंधकर यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांची माहिती दिली. महापालिकेत 4 हजार 660 पदे मंजूर आहेत. परंतु, 2 हजार 866 कार्यरत आहेत. रोजंदारीवर 620 कर्मचारी काम करत आहेत. महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी घरफाळा आणि इस्टेट विभागाकडून सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. सुनिल कदम आणि सत्यजित कदम यांनी घरफाळा घोटाळयाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी प्रशासक बलकवडे यांनी या प्रकरणाची चौकशी झाली असून दोषींवर निलंबनाची कारवाई झाल्याचे स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांकडून शहरातील सर्व प्रकल्प आणि कामांचा आढावा घेतल्यानंतर खासदार महाडिक यांनी कोल्हापूर स्मार्ट सिटी का होऊ शकत नाही असा प्रश्न केला. महापालिकेच्या विविध विभागात गडबड आहे. गैरप्रकार आणि हयगय होत असेल मुंबईत बैठक घेतली जाईल. त्यावेळी दोषी आढळल्यास कारवाई होईल. सरकार बदलले आहे हे लक्षात ठेवा असा इशारा दिला. बैठकीला उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा पाटील, माजी महापौर सुनिल कदम, प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, राजसिंह शेळके, निलेश देसाई, विजयसिंह खाडे-पाटील, विलास वासकर, किरण नकाते, रुपाराणी निकम, उमा इंगळे, भाग्यश्री शेटके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
विद्युत विभागाचे कौतुक
शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी शहरातील पथदिव्यांची माहिती दिली. सद्या शहरात सर्वत्र एलईडी दिवे असून वीजबीलात बचत होत असल्याचे सांगितले. यावेळी भाजप- ताराराणीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्युत विभागाच्या कामाबद्दल समाधान आणि कौतुक केले.
रेल्वे फूटओव्हर ब्रीज, तीर्थक्षेत्र आराखडय़ाची विचारणा
खासदार महाडिक यांनी रेल्वे फूटओव्हर ब्रीज आणि अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा सद्यस्थितीची माहिती विचारली. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी याबबतची माहिती दिली.
निधीसाठी केंद्र व राज्याकडे पाठपुरावा करणार
खासदार महाडिक म्हणाले, केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. महापालिकेके प्रलंबित योजना आणि नवीन प्रस्ताव लवकर द्यावेत.दोन्ही सरकारकडे या योजनासाठी पाठपुरावा करु.
हद्दवाढ झाली पाहिजे
कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे. त्याचबरोबर हद्दवाढ विरोधकांचे समाधान झाले पाहिजे असा तोडगा काढायला हवा. पुढील काही वर्षात शहर विकासात पुढे जाईल असे खासदार महाडिक म्हणाले.