वाळवा तालुक्यातील महायुतीच्या नेत्यांची नामुष्की टळली; विजयानंतर ही आत्मपरीक्षण करावे लागणार; आघाडी-पिछाडीने शेवट पर्यंत उत्कंठा
युवराज निकम इस्लामपूर
हातकणंगले लोकसभेच्या निकालाची उत्कंठा अखेर पर्यंत राहिली. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्या वेळी प्रेक्षकांची जशी अवस्था होते, तशी अवस्था महायुती व महाविकास आघाडीच्या समर्थकांची होत होती. फेरी गणिक उमेदवारांची आघाडी-पिछाडी होत असल्याने धाकधूक आणि काळजाचे ठोके कमी जास्त होत होते. संपूर्ण खेळ पाच-सहा हजार मताधिक्यात सुऊ होता. अखेरच्या काही फेऱ्यात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने मुसंडी मारून अवघ्या साडे दहा हजार मतांनी ’जित’ साधली. आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजीत पाटील-सऊडकर यांना हरवले. या निकालाने वाळवा तालुक्यातील महायुतीच्या नेत्यांची नामुष्की टळली. पण जिंकूनही हातकणंगले मतदार संघात महायुतीला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.
हातकणंगले मतदार संघ निवडणूक जाहीर झाल्यापासून ’हायव्होल्टेज’ बनला होता. तो निकालापर्यंत तापलेलाच होता. माने, पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यातच प्रचंड अतितटीने येथील निवडणूक झाली. शेट्टी यावेळी एकाकी लढले. पण माने आणि पाटील यांना राज्यातील नेत्यांची ताकद मिळाली.माने यांच्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात तळ माऊन बसले.पाटील यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, कोल्हापुरातून सतेज उर्फ बंटी पाटील यांनी बळ दिले. त्यामुळे ही निवडणूक उमेदवारांपेक्षा नेत्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची झाली होती. त्यातून साम, दाम, दंड, भेद या सर्व आयुधांचा वापर झाला.
वाळवा तालुक्यात महायुतीचे नेते मिनी विधानसभा निवडणूक समजून माने यांच्या प्रचारात उतरले होते. यामध्ये प्रामुख्याने माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे राहुल व सम्राट महाडीक, निशिकांत पाटील विक्रम पाटील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांचा समावेश होता. उद्धव ठाकरे शिवसेनेपेक्षा त्यांनी वाळव्यात राष्ट्रवादी व आ.पाटील यांना थेट शत्रू मानून काम केले. मतदानानंतर महायुतीत अंतर्गत कुणी आत-बाहेर केले यांवरून काहीसे वावटळ उठले, हा भाग निराळा.पण मैदान टप गेल्याची जाणीव सर्वांनाच झाली होती. तिन्ही उमेदवार आणि समर्थक विजयाचा दावा करीत होते. पण येथील अंदाज राजकीय विश्लेकानांही बांधता येत नव्हता.
निकालातून ते पहायला मिळालेच. सुऊवातीपासून महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील बारा ते तेरा हजारांच्या मताधिक्याने आघाडीवर होते. हे लीड घसरत येवून पाच-साडेपाच हजार पर्यंत राहिले. तेराव्या फेरीनंतर मात्र फासे उलटे पडत जावून माने हे आघाडीवर गेले. पण आघाडी जुजबी होती. त्यामुळे शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगावा, त्याप्रमाणे शेवटच्या फेरीपर्यंत दोन्ही कडील उत्कंठा वाढली होती. अखेर माने साडे दहा हजार मताधिक्याने जिंकले. अन महायुतीच्या नेत्यांनी सुस्कारा सोडला. विजय हा विजय असतो, तो किती मतांनी झाला हे महत्वाचे नसते. पण महाविकास आघाडीच्या पाटील यांनी शेवटपर्यंत घाम फोडला, हे मान्य करावे लागेल.
महाविकास आघाडीच्या तोंडचा घास थोडक्या मतांनी गेल्याने निराशा येणार आहे. पण जिंकूनही महायुतीच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. विधानसभा मतदार संघ निहाय अधिकृत लीड बुधवारी समजेल. त्यातून इस्लामपूर मतदार संघात कोण वरचढ ठरले, हे उमजेल. पण महायुतीला इथं विधानसभा निवडणुकीतही घासावे लागणार, ही इशारा घंटी वाजली आहे. तर महाविकास आघाडीला झालेल्या चुका सुधारुन पुढे जावे लागणार आहे. तसेच शेट्टी समर्थक शेवट पर्यंत हवेत राहिले. त्यांना ही पुढील काळात चळवळ व राजकारण याची सांगड घालावी लागणार आहे.