अत्यंत व्यग्र असल्याचे दिले कारण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बसप खासदार दानिश अली यांना उद्देशून वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी भाजप खासदार रमेश बिधुडी यांना मंगळवारी लोकसभेच्या विशेषाधिकार समितीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु बिधुडी हे समितीसमोर हजर राहिले नाहीत. याकरता त्यांनी पूर्वनिर्धारित कार्यक्रमांमध्ये व्यग्र असल्याचे कारण दिले आहे. बिधुडी हे सध्या राजस्थानात भाजपच्या प्रचारमोहिमेत सहभागी झाले आहेत. पक्षाने गुर्जर समुदायाशी संबंधित असलेल्या बिधुडी यांना टोंक जिल्ह्याचे प्रभारीपद दिले आहे. टोंक जिल्ह्dयात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. राजस्थानात 23 नोव्हेंबर रोजी सर्व 200 जागांसाठी मतदान होणार आहे.
लोकसभेत ‘चांद्रयान-3 मोहीम’वर चर्चेदरम्यान आक्षेपार्ह वर्तनासाठी बिधुडी आणि दानिश अली यांच्या विरोधात विविध सदस्यांकडून प्राप्त तक्रारींसंबंधी बिधुडी यांचे स्पष्टीकरण ऐकण्यात येणार असल्याचे विशेषाधिकार समितीकडून सांगण्यात आले होते.
चांद्रयान-3 मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल लोकसभेतील चर्चेदरम्यान बिधुडी यांनी अली यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. यानंतर दानिश अली यांच्यासोबत लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसच्या अपरुपा पोद्दार, द्रमुकच्या कनिमोळी आणि अन्य विरोधी खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती.
तसेच या खासदारांनी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठविण्याची विनंती केली होती. दुसरीकडे भाजप खासदार निशिकांत दुबे आणि रवि किशन यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून प्रथम अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता असा दावा केला होता. हे प्रकरण देखील विशेषाधिकार समितीकडे पाठविण्याची विनंती भाजपच्या खासदारांनी केली होती. लोकसभा अध्यक्षांनी सर्व तक्रारींना विशेषाधिकार समितीकडे सोपविले हेते.









