नक्षलवादी संघटनांना कमांडर मिळत नसल्याचे चित्र
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारच्या कठोर कारवाईमुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले असून छत्तीसगड पोलिसांच्या दस्तऐवजानुसार सीपाआय (माओवादी)च्या पॉलिट ब्यूरो आणि केंद्रीय समितीच्या सदस्यांच्या संख्येत मोठी घसरण झाली आहे. पूर्वी 2004 साली 16 पॉलिट ब्युरो सदस्य होते, आता ही संख्या केवळ 4 वर आली आहे. अशाच प्रकारे केंद्रीय समितीच्या सदस्यांची संख्या देखील घटून 11-12 राहिली आहे. या घसरणीचे मुख्य कारण अटक, हत्या आणि आत्मसमर्पण तसेच आजार आहे. यामुळे माओवाद्यांच्या सर्वोच्च नेतृत्वात ‘ब्रेन ड्रेन’ होत आहे, कारण जुने, अनुभवी आणि उच्चशिक्षित म्होरक्यांच्या जागी कमी शिकलेले आणि बहुतांश छत्तीसगड अन् झारखंडच्या गुरिल्ला रणनीतित तरबेज सदस्य येत आहेत.
सीपीआय (माओवादी)च्या पॉलिट ब्युरोमध्ये आता केवळ चार सदस्य जिवंत अन् सक्रीय आहेत. महासचिव नंबल्ला केशव राव उर्फ बसवराजू (वय सुमारे 67 वर्षे), मुपल्ला लक्ष्मण राव उर्फ गणपति (75 वर्षे), मल्लजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू (62 वर्षे) आणि मिसिर बेसरा (64 वर्षे) यांचा समावेश आहे. 2004 मध्ये पॉलिट ब्युरोत 16 सदस्य होते, आता ही संख्या कमी होत केवळ 4 वर आली आहे. चकमकींमध्ये मृत्यू, अटक, आत्मसमर्पण आणि आजार इत्यादी कारणांमुळे ही संख्या घटली असल्याचे छत्तीसगड पोलिसांच्या दस्तऐवजांमध्ये नमूद आहे.
सीपीआय (माओदवादी)ची दुसरी महत्त्वपूर्ण निर्णायक शाखा केंद्रीय समितीतही आता केवळ 11-12 सक्रीय सदस्य राहिले आहेत. यातील चार पॉलिट ब्युरो सदस्यांसोबत थिप्परी तिरुपति उर्फ देवजी (64 वर्षे), कदरी सत्यनारायण रे•ाr उर्फ कोसा (72 वर्षे), गणेश उइके (60 वर्षे) आणि पुल्लारी प्रसाद राव उर्फ चंद्रना (60 वर्षे) यांचे नाव सामील आहे. पतिराम मांझी उर्फ अनिल दा हा झारखंडमध्ये लपूनबसल्याचा संशय आहे. मोडेम बालकृष्ण आणि गजरला रवि हे केंद्रीय समितीचे सदस्य असले तरीही काही कारणास्तव छत्तीसगड पोलिसांच्या ‘सक्रीय/जिवंत’ माओवादी नेत्यांच्या यादीत ते सामील नाहीत.
सीपीआय (माओवादी) केंद्रीय समितीत वेळोवेळी नवे सदस्य जोडले जात असतात. खास झोनल कमिट्या आणि राज्य कमिट्यांचे प्रभारी म्हणून काही नक्षलवाद्यांना यात सामील केले जाते. परंतु ही बहुतांश करून सशस्त्र अन् आदिवासी समुदायाशी संबंधित नक्षलवादी असतात, ज्यांचे शिक्षण फारसे नसते. हा प्रकार जुन्या नेतृत्वापेक्षा खूपच वेगळा आहे, ज्यांनी उच्च शिक्षणाद्वारे प्राप्त वैचारिकबळ अन् प्रतिबद्धतेद्वारे नक्षलवादाला जिवंत राखले होते.
नक्षलवाद्यांसमोर अनेक आव्हाने
सुरक्षा दलांकडून मोहीम तीव्र करण्यात आलयाने नक्षलवाद्यांना मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर सीपीआय (माओवादी) नेत्यांचे वाढते वय, अटक, हत्या आणि नैसर्गिक मृत्यूमुळे होणारा ‘ब्रेन ड्रेन’ डाव्या उग्रवादासलाठी मोठा झटका आहे. दुसऱ्या दर्जाच्या नेतृत्वात बहुतांशकरून छत्तीसगड अन् झारखंडचे सदस्य आहेत, जे गुरिल्ला रणनीतित तरबेज आहेत, परंतु त्यांचा अन्य सदस्यांवर फारसा प्रभाव नाही.
अनेक नक्षलवादी कमांडर्सचा आजारामुळे मृत्यू
मागील काही वर्षांमध्ये अनेक पॉलिट ब्युरो सदस्यांचा आजारामुळे मृत्यू झाला आहे किंवा त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रशांत बोस उर्फ किशन दा याला 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. तर कटकम सुदर्शनचा आजारामुळे 2023 मध्ये मृत्यू झाला होता. कोबाड गांधीला 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. परंतु त्यांना पक्षातून त्यापूर्वीच हाकलण्यात आले होते. प्रमोद मिश्राला 2023 मध्ये तर सुमानंदला मागीलवर्षी अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी चेरुकुरी राजकुमार उर्फ आजादला 2010 मध्ये आणि मल्लोजुला कोटेश्वर राव उर्फ किशनजी 2011 च्या चकमकीत मारला गेला होता. सुशील राव आणि नारायण सान्यालचा अनुक्रमे 2014 आणि 2017 मध्ये आजारामुळे मृत्यू झाला होता.









