चित्रपट हे समाजातील कथाकथनाचे प्रभावी माध्यम आहे. मोहक गाणी, ग्लॅमर, कलाकार आणि चित्रपटांची भव्य निर्मिती प्रेक्षकांना अतिशय आकर्षित करत आली आहे. पडद्यावर जेव्हा आपण आपल्या आवडत्या कलाकाराला आयुष्यातील अडचणींशी झुंज देताना पाहतो, तेव्हा आपणसुद्धा त्या कथेचा एक भाग होऊन जातो. काही चित्रपट तर इतके प्रभावशाली ठरतात की चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावरसुद्धा आपल्या मनामध्ये त्याची कथा, त्यातील पात्रे दरवळत राहतात. प्रेम ही एक सार्वत्रिक भावना आहे जी आपल्या आजूबाजूला सर्वत्र असते. चित्रपटांमध्ये विनोदी, रहस्य, नाटक, प्रेम इत्यादीसारख्या भिन्न शैली असतात. पण या सर्व चित्रपटांमध्ये एक भावना समान आहे ती म्हणजे प्रेम.
त्यामुळे साहजिक आहे की चित्रपटांचा आपल्या प्रेमाच्या आकलनावर खोलवर परिणाम होऊ शकतो. चित्रपटांकडे नातेसंबंध, प्रणय आणि वास्तविक जगात प्रेमाबद्दलच्या आपल्या अपेक्षांना आकार देण्याची क्षमता आहे. या लेखात, चित्रपटांचा आपल्या प्रेमाच्या कल्पनेवर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे कसा प्रभाव पडतो आणि त्याचा आपल्या वैयक्तिक जीवनावर काय परिणाम होतो हे पाहुया.
चित्रपटांमध्ये सगळे भव्य दिव्य वाटते. सगळ्यात छोटी गोष्टसुद्धा खूप विस्तृतपणे दर्शवली जाते. त्यामुळे ती बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त महत्त्वाची वाटू शकते. म्हणूनच, जेव्हा चित्रपटांमध्ये प्रेम ही भावना विस्तृतपणे दर्शवली जाते तेव्हा त्यावर अधिक भर दिला जातो आणि चित्रपटातील पूर्ण कथा ही प्रेमाच्या जोरावर सांगितली जाते. हे चित्रण कधीकधी वास्तविक जीवनातील नातेसंबंधांसाठी अवास्तव अपेक्षा निर्माण करू शकते, ज्यामुळे निराशा आणि असंतोष निर्माण होण्याची शक्मयता असते. चित्रपटांमध्ये प्रेम नेहमीच तीव्र, उत्कट आणि परिपूर्ण दर्शवले जाते आणि कितीही त्रास झाला तरी चित्रपटातील कलाकारांना किंवा पात्रांना शेवटी प्रेमात विजय मिळतोच. यामुळे वास्तविक जीवनात निरोगी नातेसंबंधांमध्ये खरोखर काय समाविष्ट आहे याबद्दलच्या भावना विरूप होऊ लागतात.
पण याच परिस्थितीची दुसरी बाजू म्हणजे, चित्रपटांमध्ये प्रेम आणि सहानुभूती यासह आपल्यातील सुंदर भावना जागृत करण्याची अद्वितीय क्षमता असते. आपण पडद्यावरच्या पात्रांशी जोडले जातो, त्यांचे नाते यशस्वी होण्यासाठी उत्सुक होतो किंवा त्यांचे हृदयभंग अनुभवतो. हे भावनिक संबंध आपल्याला विविध प्रकारचे नातेसंबंध आणि त्यांच्या गुंतागुंतीचा अनुभव घेण्यास अनुमती देऊन प्रेमाबद्दलच्या आपल्या समाजाला आकार देऊ शकतात. चित्रपटांद्वारे, आपण अशा चढ-उतार, त्याग आणि प्रेमाच्या विजयाचे साक्षीदार ठरतो जे आपण कदाचित रोजच्या आयुष्यात अनुभवू शकणार नाही.
चित्रपट अनेकदा आपल्याला अशा पात्रांसह सादर करतात जे आपल्या जीवनात आदर्श किंवा प्रेरणास्रोत बनतात. त्यांच्या प्रेमाच्या पद्धतीचे आणि त्यांनी जपलेल्या मूल्यांचे आपण कौतुक करू लागतो. हे पात्र आपल्या आवडी, इच्छा आणि आपण जोडीदारामध्ये शोधत असलेल्या गुणांवरही प्रभाव टाकू शकतात. ते भिन्न नातेसंबंधांची गतिशीलता दर्शवून आणि आपल्या स्वत:च्या जीवनात आपण काय मिळवू इच्छितो याचे मॉडेल प्रदान करून आपल्या प्रेमाबद्दलच्या धारणेला आकार देऊ शकतात.
चित्रपट प्रेमाबद्दलच्या रूढीवादी कल्पनांना बळकटी देऊ शकतात, आणि तेच पूर्वग्रह खोदून प्रेमाची नवीन व्याख्यादेखील लोकांपुढे मांडू शकतात. चित्रपटसृष्टी माणसाच्या कल्पनेच्या जोरावर चालते, त्यामुळे त्यात दर्शवल्या जाणाऱ्या शक्मयता अनंत आहेत. वर्षानुवर्षे, सिनेमाने विविध नातेसंबंधांचे प्रतिनिधित्व करणे, पारंपरिक भूमिका मोडून काढणे आणि प्रेमाच्या अपारंपरिक प्रकारांचा शोध घेण्यात प्रगती केली आहे. कथांच्या श्रेणीचे प्रदर्शन करून, चित्रपट सामाजिक पूर्वग्रह दूर करण्यात मदत करू शकतात आणि परंपरागत नियमांच्या पलीकडे असलेल्या प्रेमाबद्दलचा आपला समज विस्तृत करू शकतात.
पण या क्रांतीला एक नकारात्मक बाजूदेखील आहे. चित्रपट प्रेमाच्या सुऊवातीच्या मोहाच्या टप्प्यावर जोर देतात, जिथे सर्व काही परिपूर्ण असते आणि समस्या सहजपणे सोडवल्या जातात. हे एक अवास्तव अपेक्षा तयार करते जे दीर्घकालीन वचनबद्धतेच्या आव्हानांना आणि गुंतागुंतीचा सामना करताना व्यक्तींना असंतुष्ट वाटू शकते. शिवाय, चित्रपटांमध्ये अनेकदा प्रेमाचे चित्रण सर्व-उपभोग करणारे, जीवनाच्या इतर पैलूंवर पडदा टाकणारे म्हणून केले जाते. पात्रे त्यांचे संपूर्ण अस्तित्व एका प्रेमासाठी रोखून ठेवतात. चित्रपटातील पात्रे त्यांचे वैयक्तिक जीवन आणि ध्येये प्रेम आणि मैत्रीसाठी सोडूनदेखील देतात.
अशा चित्रणांमुळे व्यक्तींना असा विश्वास वाटू शकतो की प्रेम हाच त्यांच्या आनंदाचा एकमेव स्रोत असावा, आणि त्यामुळे वैयक्तिक पूर्तता आणि संतुलित जीवनाचे महत्त्व कमी होते. जेव्हा चित्रपटांमध्ये दाखवलेल्या अद्भुतरम्य प्रेमाचा अनुभव वास्तविक जीवनात मिळत नाही तेव्हा लोकांना नैराश्य आणि दु:ख वाटू शकते ज्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यातील इतर अनुभवांवरदेखील होऊ शकतो.
नाट्यामय कथाकथनाच्या शोधात, चित्रपट कधीकधी अस्वास्थ्यकर वागणूक आणि नात्यांमधली नकारात्मक गतिशीलता सामान्य करतात. बऱ्याच चित्रपटांमध्ये, मत्सर, मालकीपणा आणि छळदेखील खऱ्या प्रेमाच्या प्रकटीकरणाचे उदात्तीकरण करतात. हे चित्रण दर्शकांना गोंधळात टाकू शकते, निरोगी आणि अस्वास्थ्यकर नातेसंबंधांच्या गतीशीलतेमधील रेषा अस्पष्ट करते. परिणामी, लोकांना असे वाटू शकते की नातेसंबंधात अपमानास्पद किंवा आक्रमक असणे हे प्रेमाचे कृत्य आहे ज्यामुळे ते केवळ स्वत:चे नाही तर त्यांच्या जोडीदाराचे आयुष्यदेखील खराब करू शकतात. अशावेळेला एक प्रेक्षक म्हणून हे लक्षात घेणे अतिशय आवश्यक आहे की चित्रपटांमध्ये प्रेरणा आणि मनोरंजन करण्याची क्षमता असली तरी ते प्रेमाबद्दलची आपली धारणादेखील विकृत करू शकतात. प्रेम ही एक अतिशय सुंदर भावना आहे. पण कोणतीही गोष्ट अति चांगली नाही. त्यामुळे प्रेमभावनेला आपल्या जीवनाचा भाग नक्की केला पाहिजे, पण प्रेमात वाहून जाऊन समाजातील आपले स्थान आणि आपली जबाबदारी विसरून चालणार नाही.
त्याचबरोबर, चित्रपटात दिसणाऱ्या कलाकारांचे आयुष्य हे लेखक आणि दिग्दर्शक ठरवतात, तर आपले आयुष्य कसे घडवायचे हे केवळ आपणच ठरवू शकतो. कोणत्याही मोहक वाटणाऱ्या गोष्टीकडे आंधळेपणाने आकर्षित न होता, त्याचा पुरेपूर विचार करून मगच वर्तन केले पाहिजे. जर प्रेमाची अधिक सूक्ष्म समज वाढवली, तर आपण आपल्या स्वत:च्या आणि इतरांच्या जीवनात मजबूत आणि परिपूर्ण संबंध नक्की जुळवून आणू शकतो!
-श्राव्या माधव कुलकर्णी








