कर्नाटक दलित संघर्ष समितीचा पुढाकार : डॉ. आंबेडकर, शिवाजी महाराजांचे शिल्प बसविण्याचा आग्रह
बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण होऊन दोन वर्षे उलटली तरी अद्याप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची शिल्पे बसविण्यात आलेली नाहीत. रेल्वे विभागाने शिल्प बसविण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी मागितला होता. परंतु दोन वर्षे उलटून गेले तरी शिल्प बसविण्यात न आल्याने बुधवार दि. 14 रोजी बेळगाव रेल्वेस्थानकावर आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती कर्नाटक दलित संघर्ष समितीच्यावतीने मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. इतर राष्ट्रपुरुषांची शिल्पे बसविली असताना केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांचेच शिल्प बसविताना रेल्वे विभागाला परवानगी का लागते? तसेच शिल्प तयार करून ती मागील दोन वर्षांपासून तशीच ठेवण्यात आल्याने हा राष्ट्रपुरुषांचा अवमान नाही का? असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे.
बुधवारी सकाळी 11.30 वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकापासून पदयात्रेने रेल्वेस्थानक परिसरात आंदोलन छेडले जाणार आहे. जोवर शिल्पे बसविली जाणार नाहीत, तोवर आंदोलन थांबविणार नसल्याचे समितीचे प्रमुख रवी बस्तवाडकर यांनी सांगितले. या आंदोलनामध्ये हिंदुत्ववादी संघटनाही सहभागी होणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी आंदोलनात सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्पे बसविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रारंभी सरकारनियुक्त नगरसेवक सिद्राय मेत्री यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी शंकर कांबळे, संतोष कांबळे, मनोज हित्तलमनी, सविता असोदे, कल्लाप्पा रामचन्नावर, विजया रायण्णावर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.









