जिल्हाधिकाऱ्यांची बैठकीत माहिती : स्थानिकांसाठी पर्यायी रस्ता बनवणार
बेळगाव : बेळगावमधील सांबरा विमानतळाच्या धावपट्टी व टर्मिनलचा विस्तार केला जाणार आहे. या विस्तारीकरणासाठी 57 एकर जमीन गरजेची असून ही जागा लवकरच ताब्यात घेऊन विमानतळाला उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ती पावले उचलणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या तरतुदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. धावपट्टी आणि टर्मिनलसाठी जमिनीची आवश्यकता तसेच त्याचा योग्य वापर याबाबत ब्लू प्रिंटसह अहवाल सादर करावा, त्याआधारे आवश्यकतेनुसार जमीन उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. स्थानिकांना पर्यायी रस्ते व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विमानतळ संचालकांनी स्पष्ट व लेखी माहिती द्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
विमानतळासाठी आवश्यक असलेली जमीन यापूर्वीच देण्यात आली आहे. त्यामुळे धावपट्टी व टर्मिनलचे विस्तारीकरण, सिग्नल दिवे बसविण्यासाठी आवश्यक असलेली जमीन दिली जाणार आहे. विमानतळ प्रशासनाने पूर्वी दिलेल्या जागेवरच यंत्रणा उभाराव्यात, नवीन टर्मिनल उभारण्यासाठी जी काही जमीन लागेल, ती देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. स्मशानभूमीची जागा यापूर्वीच देण्यात आली आहे. बेळगाव विमानतळाच्या विकासासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीपैकी 14.05 एकर जमीन हवाईदलाच्या ताब्यात असून तो प्रश्न परस्पर चर्चेतून सोडवावा, असे त्यांनी सांगितले. बेळगाव विमानतळाचे संचालक त्यागराजन यांनी धावपट्टी आणि टर्मिनलच्या विस्तारासाठी जमीन उपलब्ध करून देण्याची विनंती केली. पर्यायी रस्ता व इतर कामांबाबत स्थानिकांशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी, भूमी अभिलेखा विभागाचे संचालक विजयकुमार याबरोबरच विमानतळ व हेस्कॉमचे अधिकारी उपस्थित होते.









