मंत्री नितीन गडकरी धमकीप्रकरण : न्यायालयातून बॉडी वॉरंट मिळविण्यासाठी प्रयत्न
बेळगाव : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी धमकाविणाऱ्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैद्याला ताब्यात घेण्यासाठी नागपूर पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी आवश्यक न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आहे. नागपूर पोलिसांचे एक पथक गुऊवारी बेळगावात दाखल झाले आहे. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन स्थानिक पोलीस व कारागृह प्रशासनाच्या मदतीने पोलिसांनी मोबाईलसाठी शोध मोहीम राबविली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संपर्क कार्यालयाला कॉल करून धमकावण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल आढळला आहे. जयेश ऊर्फ जयेशकांत या कैद्याला ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवार दि. 21 मार्च रोजी दुसऱ्यांदा फोन करून खंडणीसाठी धमकावण्यात आले होते. यासंबंधी मंगळूर येथील एका तरुणीचीही चौकशी करण्यात आली असून नागपूर पोलिसांनी गुऊवारी रात्री हिंडलगा कारागृहात जयेशची जबानी घेतली आहे. न्यायालयाकडून बॉडी वॉरंट घेऊन जयेशला ताब्यात घेण्यात येणार असून चौकशीसाठी नागपूरला नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धमकावण्यासाठी त्याने वापरलेला मोबाईल सापडल्याने तपास यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. याआधी 14 जानेवारी रोजी जयेशने खंडणीसाठी धमकाविल्याचा प्रकार घडला होता. सलग दुसऱ्यांदा ही घटना घडली असून पोलीस व कारागृह विभागाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे.









