1 जानेवारीपासून बेंगळूरला पदयात्रा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरूच
बेळगाव : सेवेत कायम करावे या मुख्य मागणीच्या पूर्ततेसाठी राज्यातील अतिथी प्राध्यापकांकडून आंदोलन हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील अतिथी प्राध्यापकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेऊन एक पायावर उभे राहून राज्य सरकारचे लक्ष वेधले. राज्यामध्ये सरकारी द्वितीय दर्जा महाविद्यालयांमध्ये सेवा बजाविणाऱ्या अतिथी प्राध्यापकांना सेवेत कायम करण्यात यावे. तसेच सेवा सुरक्षा देण्यात यावी. या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन हाती घेण्यात आले आहे. सुवर्ण विधानसौध येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान प्राध्यापकांकडून आंदोलन केले होते. मात्र राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. कोणतेच आश्वासन दिले नाही. त्यामुळे अतिथी प्राध्यापकांकडून काम बंद आंदोलन हाती घेतले आहे. नोव्हेंबरपासून अतिथी प्राध्यापकांनी वर्गावर न जाता हे आंदोलन सुरू केले आहे. यामुळे सरकारी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शेक्षणिक नुकसान होत आहे. बहुतांश सरकारी महाविद्यालयांत अतिथी प्राध्यापकच सेवा बजावत आहेत.
गेल्या 10 ते 15 वर्षांपासून गौरवधनावरच सेवा द्यावी लागत आहे. दुसऱ्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी अनेक जणांना वयोमर्यादेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या गौरवधनावरच सेवा बजावी लागत असल्याने महागाईत हे वेतन अत्यल्प आहे. राज्य सरकारकडून सरकारच्या विविध खात्यांमध्ये सेवा बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे कायमस्वरुपी सेवेत सामावून घेतले आहे, त्याप्रमाणेच अतिथी प्राध्यापकांनाही सेवेत समावून घ्यात, अशी मागणी करण्यात आली. सरकारकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यानेच शिर्षासन व एका पायावर थांबून आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. 1 जानेवारीपासून जिल्ह्यातील सर्व अतिथी प्राध्यापकांकडून बेंगळूर येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी पदयात्रा काढली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.









