पोलिसांची चौकशी करण्याची मागणी
बेळगाव : वडगावसह उपनगरात मध्यरात्री अज्ञातांचा वावर वाढला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी या अज्ञातांच्या मुसक्या आवळून परिसराला भयमुक्त करण्याची मागणी केली जात आहे. वडगाव येथील समृद्धी कॉलनी, पारिजात कॉलनी, आनंदनगर परिसरात दि. 14 मार्च रोजी मध्यरात्री एक अज्ञात संशयास्पदरित्या वावरताना आढळून आला आहे. त्याची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. केवळ रस्त्यावरून ये-जा केली असेल तर धास्ती वाटण्याचे कारण नाही. मध्येच तो एका घराच्या कंपाऊंडमध्ये घुसतो. त्यामुळेच त्याच्याविषयी संशय बळावला आहे. रस्त्यावरून चालत जाता जाता एका घराचे गेट उघडून तो व्हरांड्यात शिरतो. त्यानंतर मुख्य रस्त्यावरून चालत निघून जातो. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने तो मध्यरात्री या परिसरात फिरत असणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाढत्या चोऱ्या, घरफोड्यांमुळे संशय वाढला असून पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.









