शेतात काम करताना दोन वाघांचे दर्शन
खानापूर : सावरगाळी-आनंदगड जंगल भागात दोन वाघांचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट होत आहे. सावरगाळी, नायकोल परिसरातील रहिवाशांना गेले काही दिवस रोज वाघांच्या डरकाळीचा आवाज येत आहे. तर सावरगाळी येथील समिती कार्यकर्ते नारायण कापोलकर यांना शेतात मशागतीचे काम करत असताना वाघांच्या डरकाळीचा आवाज आला. त्यानंतर थोड्याच वेळाने त्यांच्या नजरेस दोन वाघ जाताना दिसून आले. नायकोल, आनंदगड हा परिसर घनदाट जंगलाचा असल्याने या ठिकाणी वाघांचे वास्तव्य असते. वनखात्याने जंगलाच्या बाजूला चरी खोदल्याने जंगलात गुरे चारावयास जाण्यास बंदी असल्याने गुराखी आता जंगलात जात नाहीत. त्यामुळे कोणत्याही प्राण्यांचा संपर्क येत नाही. गेल्या दोन दिवसांपूर्वी नारायण कापोलकर हे शेतात काम करत असताना त्यांच्या दृष्टीस वाघ दिसला. वाघांच्या मुक्त संचारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मशागतीची कामे सुरू असल्याने शेतकरी शेतात कार्यरत आहेत. यासाठी वनखात्याने याबाबत खबरदारीची उपायोजना करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.









