महामार्ग रोखला : पूर्वसूचना न देता कार्यवाही केल्याचा आरोप
प्रतिनिधी /चिकोडी
चिकोडी शहरातील संकेश्वर-जेवर्गी राज्य महामार्गावर असलेल्या सोमवार पेठेतील एका दुकानाचे अतिक्रमण कोणतीही सूचना न देता हटविल्याच्या कारणावरून आमदार गणेश हुक्केरी यांनी नगर परिषद अधिकाऱयांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आंदोलन केले.
शनिवारी पहाटे येथील प्रफुल्ल वाडेद यांनी दिवाळीनिमित्त बेकायदेशिरपणे उभारलेले दुकानाचे शेड नगर परिषदेच्या अधिकाऱयांनी जेसीबीने पाडले. हे वृत्त समजताच आमदार गणेश हुक्केरी यांनी घटनास्थळी धाव घेऊन सणासुदीच्या काळात पहाटेच्यावेळी नगर परिषदेने कोणतीही चर्चा किंवा सूचना न देता ही केलेली कार्यवाही अयोग्य आहे. सर्वच अतिक्रमणे काढण्याचे सोडून द्वेषापोटी एकमेव अतिक्रमण काढण्यात आले आहे. नगर परिषदेने अतिक्रमणे हटविण्याबाबत सभागृहात चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी सूचना अधिकाऱयांना दिली. यावेळी महावीर मोहिते, रामा माने, गुलाब बागवान यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते.
आमदारांनी धारेवर धरताच सायंकाळपर्यंत पाडलेले बांधकाम पूर्ववत करण्याची त्यांनी हमी दिली. थेट रस्त्यावरच आमदारांनी आंदोलन केल्याने रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. रहदारी पोलिसांनी गर्दी असलेल्या ठिकाणी धाव घेत वाहतुकीची कोंडी सोडविली. यानंतर नगरसभेचे मुख्याधिकारी डॉ. सुंदर रोगी यांनी नगरपरिषदेचा परवान नसताना बेकायदेशीर बांधकाम केले असल्याने नोटीस देऊन ते अतिक्रमण हटविल्याचे सांगितले.









