कुंभोज,वार्ताहर
Kumbhoj : ग्रामपंचायतीच्या नावे असलेल्या जमीनीवरती लादलेले १४४ कलम रद्द करावे या प्रमुख मागणीसाठी कुंभोज ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने तहसीलदार कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला . यावेळी ग्रामस्थांच्या वतीने दिलेल्या गाव बंदच्या हाकेला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. मागणीचे निवेदन तहसिलदार कल्पना ढवळे यांना देण्यात आले.कायद्यांच्या बाबीचा अभ्यास करून निर्णय देऊ असे आश्वासन ग्रामस्थांना ढवळे यांनी दिले.
कुंभोज येथील मुस्लिम समाजाचा गट नंबर १९०३ पैकी क्षेत्र ०.८२ हेक्टर आर या क्षेत्रात मुस्लिम समाजाचे कब्रस्तान आहे . हे क्षेत्र ग्रामपंचायतीच्या नावे असल्याने या क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीकडून आठवडा बाजार भरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.या जमिनीबाबत दिवाणी न्यायालयात दावा सुरू आहे.याशिवाय मुस्लिम कब्रस्तानाकरीता पर्यायी जागा उपलब्ध असताना मुस्लीम जागेची मागणी करत आहेत असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, हातकणंगले तहसीलदार, गटविकास अधिकारी, भुमिअभिलेख उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याकरिता या क्षेत्रास १४४ कलम लागू केले होते.तसेच हा जागेचा वाद एकत्र बसवून मिटवावा असेही प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी सांगितले होते.
परंतु आठवडयापूर्वी वडगाव येथील दिवाणी न्यायालयात असलेला दावा मुस्लिम समाजाने मागे घेतल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने रविवारी सकाळी त्या परिसरातील झाडे, झुडपे जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छ करण्याचे काम सुरू होते. यावेळी मुस्लिम समाजाने विरोध केल्याने वाद निर्माण झाला होता .परिणामी सदर जागेवरचे कलम १४४ काढून घ्यावे या मागणीसाठी हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मोर्चा काढून निवेदन दिले . मोर्चामध्ये सरपंच अरुणादेवी पाटील , उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
Previous Articleयंदाच्या गुढीपाडव्याला असा करा झटपट मेकअप
Next Article सततच्या ॲसिडिटीवर हे आहेत घरगुती उपाय









