जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
बेळगाव : राज्य सरकारकडून दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांग ग्रामीण पुनर्वसती कार्यक्रम अंतर्गत दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या अंतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक सबलीकरण खात्यामध्ये गौरवधनावर अनेक जणांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर दिव्यांगांना सेवेत कायम करून घेण्यात यावे. सरकारी सेवा, सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात आदी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी नवकर्नाटक दिव्यांग संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. चन्नम्मा चौकातून मोर्चाने येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारकडून दिव्यांगांसाठी राबविण्यात आलेल्या दिव्यांग ग्रामीण पुनर्वसती कार्यक्रमांतर्गत तालुका पंचायत, ग्राम पंचायत, महानगरपालिकेच्या व्याप्तीमध्ये पुनर्वसती कार्यकर्ता म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यामध्ये 6 हजार 860 दिव्यांग सेवा बजावत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सेवा बजाविणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कोणत्याच सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत.
त्यामुळे दिव्यांगांची आर्थिक ओढाताण होत आहे. सेवा बजाविणाऱ्या पुनर्वसती कार्यकर्ता दिव्यांगांना सेवेत कायम करून घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. सरकारच्या विविध खात्यांमध्ये रिक्त असणाऱ्या पदांवर नियुक्ती करून घेण्यात यावी. गेल्या 15 पेक्षा अधिक महिन्यांपासून सेवा बजाविणाऱ्या या कर्मचाऱ्यांची सेवा लक्षात घेत सरकारने याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गौरवधनावर काम करणाऱ्यांना सेवेत कायम करून वेतन वाढ देण्यात यावी. महाराष्ट्राच्या धर्तीवर दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय उभारण्यात यावे. राज्यातील नवीन तालुक्यांमध्ये पुनर्वसती कार्यकर्त्यांची भरती करून घेण्यात यावी. मनपा व्याप्तीमध्ये प्रत्येक वॉर्डाला एक पुनर्वसती कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात यावी. सेवेत असताना कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये भरपाई देण्यात यावी, अटींमध्ये शिथिलता करून सहा महिने सेवा दिलेल्यांना या योजनेचा लाभ करून देण्यात यावा, महिला कार्यकर्त्यांना प्रसूती रजेदरम्यान वेतन देण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय कुडची, फकिरगौड पाटील, डॉ. अंबाजी मेटे, व्यंकटाप्पा चव्हाण, राजेंद्र कमनूर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









