राजधानी दिल्लीत नेहमीच राजकीय घमासान सुरु असते, पक्ष पातळीवर, प्रादेशिक पातळीवर आणि राष्ट्र व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच काहीना काही हालचाली, कुजबुज, पवित्रे, लॉबींग दिसून येत असते. संसदेच्या अधिवेशन काळात हा पारा वाढलेला असतो. काही दिखावे असतात. काही कुरघोड्या असतात तर काही शह प्रतिशह असतात. जे सोईचे होईल ते केले जाते. गेला आठवडा असाच वेगवेगळ्या घटनांनी भरलेला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची अचानक व पाठोपाठ घेतलेली भेट, स्वातंत्र्यदिन झेंडावंदनाचे वेध, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, ट्रंप यांचे टेरिफ आणि मनमानीचे चाळे हे जसे विषय आहेत तसे भाजपाच्या अजेंड्यावरचे काही महत्त्वाचे विषयही पेंडिंग आहेत पण पंतप्रधान व गृहमंत्री यांनी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट कशासाठी घेतली हे कोडे अद्याप सुटलेले नाही. दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाठोपाठ दिल्लीला जाणे आणि अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणे यामागे काहीतरी शिजते आहे. शिंदे यांना त्यांचे मंत्री अडचणीत आणत असले तरी त्यांच्या मनात खदखद आहेच. मंत्रीमंडळातील काही मंत्री उबाठा शिवसेनेशी मेतकुट जमवून आहेत हा जसा राग आहे तसा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका होऊपर्यंत सरकारमध्ये बदल नकोत, आगामी निवडणुका महायुती म्हणून लढूया पण आम्हाला स्पेस हवी, आदी बाबी त्यांना पंतप्रधान व गृहमंत्री यांच्या कानावर घालायच्या असाव्यात. त्यात चुकीचे काही नाही पण आम्ही राज्यात कुणाला मानत नाही आम्ही थेट पंतप्रधान मोदींशी बोलतो, हेपण दाखवायचे असावे. महाराष्ट्रात महायुतीत सगळे ऑल वेल नाही, असाही संदेश दिला गेला आहे. भाजपात सुरु असलेली मेगा भरती महाआघाडीच्या घटक पक्षांना डोकेदुखी झाली आहे. पण ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी मोदींनी विरोधी खासदारांसह विविध पक्ष्यांचा सहभाग असलेली शिष्टमंडळे जगभर पाठवली आणि भारताची भूमिका मांडली. जगभरातून त्याचे कौतुक होत आहे. भाजपचे विरोधकही सरकारबद्दल बरे बोलू लागले आहेत. आणखी एक बदल म्हणजे भाजपचा शिवसेना ठाकरे गटाकडे आणि शिवसेनेचा भाजपकडे बघण्याचा, बोलण्याचा दृष्टीकोन थोडा बदलला आहे. यमुनेकाठी होत असलेले हे बदल सर्वांना सजग करत आहेत. त्यातच ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली मोहीमेवर आहेत. संजय राऊत यांच्या निवासी डेरा ठोकून ते वेगवेगळे अंदाज घेणार असे दिसते आहे. शरद पवार यांनी आपल्या निवासस्थानी आघाडी घटक पक्षांसाठी प्रितीभोजन ठेवले आहे. राहुल गांधींनी जेवणाचा जंगी बेत केला आहे. या भोजनात अनेकांची प्रिती व आगामी दिशा दिसेल. पाठोपाठ राहुल गांधी यांनी भाजपा विरोधी आघाडीची बैठक बोलावली आहे, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी हातमिळवणी केली असे दिसते आहे. बेस्ट सहकारी पतपेढी निवडणुकीत दोन्ही बंधूंनी एकच पॅनेल उभे केले आहे. मराठीचा मुद्दा आणि ठाकरे ब्रॅंड व मुंबई महापालिका निवडणूक यासाठी हे एकमेकांना टाळी देणं असलं तरी कॉंग्रेसला राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सोबतची आघाडी अडचणीची ठरु शकते. राज ठाकरे यांना आघाडीत घेतले तर कॉंग्रेसची मतपेटी अडचणीत येणार हे उघड आहे. त्यामुळे दिल्लीतील हालचाली, राजकारणावर दीर्घ काळ परिणाम करणाऱ्या ठरणार आहेत. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका वर्षाअखेरीस होतील अशी चिन्हे आहेत. त्यामुळे चाचपणी होईल पण विषय थंड करून हाताळला जाईल असाही एक प्रवाह आहे. भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार, यांची जवळीक, शिवसेना खासदार चतुर्वेदी यांनी मोदी यांची घेतलेली भेट, भेटीचा फोटो समाजमाध्यमावर टाकणे यालाही अर्थ आहे व तो अर्थ शोधला जातो आहे पण त्यामुळे एकनाथ शिंदे थोडे अस्वस्थ दिसत आहेत. मोदींनी पाकिस्तानला मुहतोड करारी जवाब दिला त्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी व अमित शहा यांचा गृहमंत्री पदाचा विक्रम झाला म्हणून त्यांचे अभिनंदन करायला मी दिल्लीत आलोय असे शिंदे सांगत असले तरी ते औपचारिक कारण आहे. खरे कारण बेताल वागणारे, बोलणारे मंत्री आणि मंत्रीमंडळातील काहींना हटवा हा त्यांच्या संदर्भातील विषय आहे. अमेरिकेने ट्रंप टेरिफ व दंड वगैरे घोषणा करुन भारताची अर्थव्यवस्था डेड वगैरे म्हणण्यापर्यंत मजल मारली आहे. रिझर्व्ह बँक गव्हर्नर यांनी पत धोरणातून जो विश्वास व्यक्त केला आहे, तो ट्रंप यांच्या आरोपांना उत्तर देण्यास पुरेसा आहे. मोदी या उद्धट, उर्मटपणाला शब्दातून नव्हे कृतीने उत्तर देणार हे उघड आहे. भारताने अमेरिका वगळून जगभर निर्यात वाढीसाठी योजना आखली आहे. भारताची जनता तिचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व व भारताचे निर्णय अधिकार यावर कोणालाच दडपण आणता येणार नाही, दबाव टाकता येणार नाही व देशाच्या व देशवासीयांच्या हिताशी कोणतीच तडजोड करणार नाही अशी सरकारची स्वच्छ भूमिका आहे. मोदी चीनचा दौरा करत आहेत तर अजित डोबाल रशिया दौऱ्यावर आहेत. डोनाल्ड ट्रंप यांच्या उलटसुलट उड्या आणि आरोळ्या यामुळे जगात नवी समीकरणे आकारत आहेत. भारताचे हित आणि भूमिका महत्त्वपूर्ण असणार हे वेगळे सांगायला नको. नव्याने आकाराला येणारे संघटन, ट्रंम्प यांना धडा शिकवतील असे दिसते आहे. दिल्लीतील हा आठवडा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी कुणाचे नाव पुढे येते. या नाव निवडीत राजकीय समीकरणे असतीलच पण रक्षाबंधनाला कोण कुणाला राखी बांधणार आणि बांधून घेणार हे बघावे लागेल. तूर्त म्हैस पाण्यात आहे. यमुनेला पूर आलेला आहे आणि दिल्लीतील वारे लक्षवेधी बनले आहे.
Previous Articleनिर्माण करूया गावोगावी ‘देवराई’
Next Article बजाज ऑटोचा नफा वाढला
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








