ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आपल्याला विरोधीपक्षनेते पद नको, आता संघटनात्मक जबाबदारी हवी असं म्हणत अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली होती. त्यानंतर राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात आज अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर बैठक सुरू आहे.
राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. सध्या प्रदेशाध्यक्षपदी असलेले जयंत पाटील यांनी पदाचा पाच वर्ष दोन महिने इतका कालावधी पूर्ण केला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या राजघटनेनुसार एका व्यक्तीला एका पदावर तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहता येत नाही. त्यामुळेच आता प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु झाली आहे. अजित पवार प्रदेशाध्यक्ष व्हावे म्हणून आमदार लॉबिंग करत असल्याचे बोललं जातं आहे.
दरम्यान, या बैठकीत पक्षातील संघटनात्मक बदलावरही चर्चा सुरू असल्याची चर्चा असल्याची माहिती आहे. बैठकीत काय निर्णय होतो, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.








