राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांचे प्रतिपादन : सांखळी येथे रुग्णांना आर्थिक मदतीचे वितरण
प्रतिनिधी / सांखळी
जनतेला सर्वच क्षेत्रात चांगली सेवा पुरविण्यात गोवा राज्य देशात अव्वल ठरले आहे. जतनेकडूनही याचा चांगल्या प्रकारे लाभ घेतला जात आहे. या सेवाकार्यासाठी राज्यात खासगी कंपन्यांकडून मिळणाऱ्या सीएसआर निधीचा वापर व्हावा. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आज गोवा राज्य स्वयंपूर्णतेकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेही चांगले सहकाय लाभत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांखळी येथे केले.
राज्यपाल निधीतून डायलॅसीस व कँसर रुग्णांना आर्थिक मदतीचे वितरण तसेच विकलांग आयोगातर्फे अपंग रुग्णांना ब्रेन कंट्रोल मायोइलेक्ट्रिक हात वितरण करण्यात आले. यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, विकलांग आयोगाचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकर, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, राज्यपालाचे सचिव एम. आर. एम. राव यांची उपस्थिती होती.
विकलांगांसाठी उपकरणांचे केंद्र स्थापन करणार : मुख्यमंत्री
अंत्योदय, सर्वोदय व ग्रामोदय या तत्वावर केंद्र व गोवा सरकार काम करीत आहे. लोकांना पुन्हा उर्जा व उमेद प्राप्त व्हावी व विकलांग लोक पुढे यावे, यासाठी राज्य सरकार काम करीत आहे. त्यासाठीच लवकरच गोव्यात विकलांग लोकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या यंत्र व उपकरणांचे कायमस्वरूपी केंद्र स्थापन केले जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी केली.
50 ते 60 हजार लोकांना अशा प्रकारच्या यंत्रांची गरज असून वाढते अपघात आणि त्यामुळे येणाऱ्या अपंगत्वावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणार. कँसर रुग्णांसाठी मेडीक्लेम योजनेद्वारे यापूर्वी दीड लाख रुपये मिळत होते, ते आता पाच लाख करणार. उच्च मधुमेह असलेल्यांनी काळजी घेऊन आपल्याला किडनी विकार न होण्यासाठी मधुमेह नियंत्रणात ठेवावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी केले.
समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी देशाच्या सीमेवर शत्रुशी लढा देताना जखमी होऊन हात किंवा पाय गमावलेल्या सैनिकांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम लवकरच आयोजित केला जाणार आहे.
यावेळी डॉ. इर्शाद काझी व निरज सक्सेना यांनी विचार मांडले. आतापर्यंत राज्यपालांकडून सुमारे 2.75 कोटी रुपयांची मदत समाजातील विविध आजारी घटकांना केली आहे. असे एम.आर. राव यांनी सांगितले. साखळीत रवींद्र भवनात आयोजित कार्यक्रमात 74 जणांना आर्थिक साहय्याचे धनादेश वितरीत करण्यात आले. सूत्रसंचालन सिद्धी प्रभू यांनी केले. तर आभार गुरुप्रसाद पावसकर यांनी मानले.









