शेतकरी संघटना-होलसेल भाजीमार्केट असोसिएशनतर्फे एपीएमसी मंत्री शिवानंद पाटील यांच्याकडे मागणीचे निवेदन
वार्ताहर /अगसगे
बेळगाव एपीएमसी मार्केटयार्डला सहकार खाते आणि एपीएमसी खात्याचे मंत्री शिवानंद पाटील यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर भाजीमार्केट परिसराची पाहणी केली. यावेळी जय किसान भाजी मार्पेटचा परवाना रद्द करावा व त्याचे स्थलांतर एपीएमसी भाजी मार्केटमध्ये करावे. असे निवेदन शेतकरी संघटना आणि होलसेल भाजीमार्केट असोसिएशनतर्फे देण्यात आले. मंत्री शिवानंद पाटील यांनी पहिल्यांदाच एपीएमसीला बुधवारी भेट दिली. यावेळी कार्यालयामध्ये त्यांचे स्वागत कार्यदर्शी गुरूप्रसाद यांनी केले. माजी एपीएमसी अध्यक्ष युवराज, कदम माजी सदस्य मनोज मत्तीकोप, महेश कुगजी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यालयात झालेल्या बैठकीत जय किसान भाजी मार्केट संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यांना कोणत्या अटी घालून परवाना दिला आहे. यामुळे एपीएमसीला किती नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण असे सांगून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. सध्या आमच्या सरकारने एपीएमसी कायद्या रद्द केला आहे. येत्या अधिवेशनमध्ये ठराव करून सरकारी एपीएमसींना प्राधाय देणार आहे, असे आश्वासन मंत्री शिवानंद पाटील यांनी दिले.
शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक
यावेळी शेतकरी संघटनेचे नेते बसवराज नाईक, चन्नाप्पा पुजारी, राघवेंद्र नाईक, प्रकाश नाईक, बसू बडन्नवर, शिवलिंग मिसाळे यांनी जय किसान भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांचे टेम्पो, वडाप आदी वाहनधारकांकडून एन्ट्री फीच्या नावाने 50 ते 250 रुपये वसूल करीत आहेत. वजनात दोन ते पाच किलोपर्यंत काटामारी करतात. एका पोत्याला दुप्पट हमाली आकारतात. आमच्या भाजी पाल्याचा भाव शेतकऱ्यांसमोर न करता खरेदीदार दुकानदारासमोर करतात. यामुळे आमची आर्थिक पिळवणूक करतात. तरी जय किसान भाजी मार्केट बंद करून त्याचे स्थलांतर एपीएमसी होलसेल भाजी मार्केटमध्ये करावे असे निवेदन मंत्र्यांना दिले.
आमच्यावर उपासमारीची वेळ
एपीएमसी होलसेल भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी 20 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंत गाळे खरेदी केले आहेत. सुरूवातीला व्यवहार चांगला होता.. शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद होता. यामुळे एपीएमसीपासून दरमहा लाखो रुपये कर मिळत होता. मात्र, गेल्या दीड वर्षापासून जय किसान हे खासगी भाजी मार्केट झाल्याने येथील व्यवहार ठप्प झाला आहे. यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, अशी व्यथा व्यापाऱ्यांनी मंत्र्यांसमोर मांडली.
मंत्र्यांनी व्यक्त केली खंत
सुमारे दोनशे कोटी रुपये खर्च करून उभारलेले गाळे ओसाड पडलेले पाहून मंत्र्यांनी पाहणीप्रसंगी खंत व्यक्त केली. यावेळी होलसेल भाजी व्यापारी सतीश पाटील, बसनगौडा पाटील, नितीन मुतगेकर, सदानंद पाटील, एम. वाय. पाटील, आसिफ कलमणी, जावेद सनदी, मोशिन धारवाडकर, संदीप अम्बोजीसह इतर उपस्थित होते.









