श्रीराम सेना हिंदुस्थानची हेस्कॉमकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : येळ्ळूर येथील शिवसेना चौकात युनियन बँकेसमोर 25 केव्ही क्षमतेचा धोकादायक ट्रान्स्फॉर्मर आहे. ट्रान्स्फॉर्मर शेजारीच मंडळाचा फलक उभा केला जात आहे. तसेच ट्रान्स्फॉर्मरखाली लहान मुले खेळत असतात. हा ट्रान्स्फॉर्मर वाहतुकीसाठी अडथळा ठरत असल्याने तो इतरत्र हलवावा, अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्थान येळ्ळूर विभागाच्यावतीने सोमवारी हेस्कॉमचे अधीक्षक अभियंता विनोद करूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. कलमेश्वर गल्ली, लक्ष्मी गल्ली, पाटील गल्ली येथील नागरिकांना ये-जा करताना या ट्रान्स्फॉर्मरमुळे अडथळे येत आहेत. यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. समोरच बँक असल्यामुळे नागरिकांची वाहने याठिकाणी पार्किंग केली जातात. याचा फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे. त्यामुळे हेस्कॉमनने हा ट्रान्स्फॉर्मर इतरत्र हलवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे हेस्कॉम खात्याकडे करण्यात आली आहे. विनोद करूर यांनी नागरिकांना सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी ग्रा. पं. सदस्य रमेश मेणसे, शुभम जाधव, सौरभ जाधव, चेतन देवलतकर, आकाश कुगजी, विपुल जाधव, सौरभ कुगजी, जयंत पाटील, गणेश कुगजी, मंथन खादरवाडकर यासह इतर उपस्थित होते.









