हळदी समारंभाला जाताना ट्रकने केला घात
डिचोली/ प्रतिनिधी
सांखळी ते वाळपई या मुख्य रस्त्यावर हरवळे (सुपाचीपुड) येथे ट्रक व दुचाकी यांच्यात काल बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात संसारवाडा खालचे हरवळे येथील एका दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला. सुदैवाने या अपघातात मयत दाम्पत्यासोबत असलेला त्यांचा एक वर्षीय मुलगा बचावला. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. हरवळे गावावर शोककळा पसरली आहे.
काल बुध. दि. 15 फेब्रु. रोजी सकाळी 10.15 वा. हा अपघात घडला. साखळीहून होंडा वाळपई येथे जाणाऱ्या रस्त्यावर नवेदार हरवळे येथे सुपाची पुड पुल ओलांडल्यानंतर जवळच हा अपघात घडला.

संसारवाडा खालचावाडा हरवळे येथील किशोर कृष्णा नाईक (वय 30 वर्षे), त्यांची पत्नी अर्चना किशोर नाईक (23 वर्षे) व एक वर्षीय मुलगा सिध्दांत हे जीए 04 एम 0347 या एसेस दुचाकीने होंडाच्या दिशेने जात होते. त्याच दिशेने त्यांच्या मागाहून येणाऱ्या ट्रक क्र. जीए 01 यु 3244 ने त्यांना पुल संपल्यावर लगेच ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून दुसरी गाडी आल्याने सदर ट्रकचालक प्रकाश दत्ताराम मुळगावकर (रा. पाळी वेळगे, वय 61) याने ट्रक आत घेताच पुढील चाकाला किशोर व अर्चना यांची दुचाकी लागली व ते दोघेही रस्त्यावर फेकले गेले. ट्रकचे डावीकडील मागील चाक त्यांच्या अंगावरून गेले.
सुदैवाने त्यांच्याबरोबर असलेला सिध्दांत हा लहान मुलगा बाहेर फेकला गेल्याने वाचला. त्याला किरकोळ जखम झाली. किशोर व अर्चना या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच ट्रकचालकाने गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु ही घटना पाहिलेल्या व मागे पुढे वाहने घेऊन असलेल्या लोकांनी त्याला अडवून ठेवले.









