
सिक्कीमची कथा अन् व्यथा
सिक्कीममध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसानंतर आलेल्या महापुरात अनेक भागांचे मोठे नुकसान झाले आहे. भारताच्या ईशान्येकडील सिक्कीम या राज्यात घडलेल्या या आपत्तीने प्रचंड नुकसान केले. ढगफुटीमुळे तिस्ता नदीच्या प्रवाहाने भारतीय लष्कराच्या छावणीला वेढल्याने 23 सैनिक बेपत्ता झाले. तसेच काही सर्वसामान्य नागरिकही वाहून गेले असून बऱ्याच जणांचा अद्याप थांगपत्ता लागू शकलेला नाही. अनेक लष्करी आस्थापनांचेही मोठे नुकसान झाले असून पाण्यासोबत आलेल्या डोंगरांवरील गाळ व चिखलाने अनेक वाहने गाडली गेली आहेत. या आपत्तीने 2013 मध्ये उत्तराखंडमधील केदारनाथ येथे घडलेल्या दुर्घटनेची आठवण करून दिली. आता सिक्कीममध्येही तेच घडले जे केदारनाथमध्ये झाले होते. त्या पार्श्वभूमीवर सिक्कीममधील सद्यस्थितीचा घेतलेला हा आढावा…
सिक्कीमची ओळख…
भारतातील दुसरे सर्वात लहान राज्य आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य असूनही सिक्कीम निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे. देशाच्या उत्तर-पूर्व (ईशान्य) भागात स्थित सिक्कीमच्या दक्षिणेला पश्चिम बंगालची सीमा आहे. दक्षिण-पूर्वेला भूतान, पश्चिमेला नेपाळ आणि उत्तर-पूर्वेला चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशाशी त्याची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. सुंदर पर्वत, खोल दऱ्या आणि जैवविविधतेमुळे सिक्कीम हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. गंगटोक हे सिक्कीममधील सर्वात मोठे शहर असण्यासोबतच राजधानीदेखील आहे. सिक्कीमचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 7,000 चौरस किलोमीटर आहे. सिक्कीम हा 1975 मध्ये भारताचा एक भाग बनला आणि तेव्हापासून येथील राजकीय रचना देशाच्या इतर भागांसारखी आहे. येथील विधानसभेत 32 सदस्य असून ते निवडणुकीद्वारे निवडले जातात.
राजधानी ‘गंगटोक’
सिक्कीमची राजधानी गंगटोक हे सिक्कीममधील सर्वात मोठे शहर आहे. गंगटोक शहर शिवालिक टेकड्यांमध्ये 5,500 फूट उंचीवर राज्याच्या दक्षिण-पूर्व भागात वसलेले आहे. स्थानिक भाषेत गंगटोक या शब्दाचा अर्थ ‘पर्वत शिखर’ असा होतो. हे संपूर्ण देशातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हिमालयाच्या शिखरावर वसलेले हे राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. गंगटोक हे पूर्व सिक्कीम जिह्याचे मुख्यालय देखील आहे. गंगटोकच्या पूर्वेकडील भागातून जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या कांचनजंगा पर्वताचे दृश्य पाहता येते.
वातावरणीय स्थिती…
सिक्कीममध्ये राहणारे लोक दोन प्रकारचे हवामान अनुभवतात. राज्याच्या उत्तरेकडील भागात टुंड्रा प्रकारचे हवामान आहे. तर दक्षिणेकडील भागात उष्णकटिबंधीय हवामान आहे. टुंड्रा प्रकारच्या वातावरणामुळे राज्याचा उत्तरेकडील भाग वर्षातील जवळजवळ चार महिने बर्फाने झाकलेला असतो. सिक्कीमचा हिवाळा अतिशय कडक आणि बोचऱ्या थंडीचा असतो. बऱ्याचदा येथील तापमान शून्याच्या खाली जाते. या राज्याचा बहुतांश भाग डोंगराळ असल्यामुळे सिक्कीमचा उन्हाळाही आल्हाददायक असतो. उन्हाळ्यात येथील तापमान 28 अंशांच्या वर जात नाही.
सुंदर पर्यटन अन् कृषीसंपन्नता…
सिक्कीमची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटन, कृषी, काही उद्योग आणि फलोत्पादनावर आधारित आहे. विपुल नैसर्गिक सौंदर्य, आकर्षक हवामान आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यामुळे देशाच्या या भागात पर्यटनाची भरभराट झाली असून सिक्कीमच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनला आहे. सिक्कीमचा बराचसा भाग डोंगर आणि पर्वतांनी व्यापलेला असूनही येथे मोठ्या प्रमाणावर शेती करणे शक्मय आहे. सिक्कीममध्ये प्रामुख्याने चहा आणि वेलचीचे उत्पादन होते. याशिवाय इतर पिकांमध्ये तांदूळ, मका, बटाटा, गहू, संत्री आणि आले यांचा समावेश होतो.
‘ढगफुटीसदृश’ दुर्घटनेने हाहाकार

राज्याच्या पर्वतीय भागात लोनाक तलावक्षेत्रात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने सिक्कीममध्ये हाहाकार उडाला. तलाव फुटून त्यातील पाणी बाहेर पडल्याने तिस्ता नदीपात्राला उधाण आले. 17,000 फूट उंचीवरून बरेच पाणी वेगाने खाली आल्याने त्यात दगड आणि चिखलही वाहून गेला. तिस्ता नदीच्या पातळीत अचानक 20 फुटांनी वाढ झाली. लाचेन व्हॅलीमध्ये अचानक पाण्याचा लोट प्रचंड वाढला. तिस्ताच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे खोऱ्यातील अनेक लष्करी आस्थापने वाहून गेली. याशिवाय कित्येक घरे आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले आहे. नुकतेच सुमारे 13,000 कोटी ऊपये खर्चून बांधलेले तिस्ता-3 जलविद्युत प्रकल्पाचे 60 मीटर उंच धरण अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात अवघ्या काही तासात पूर्णपणे वाहून गेले. विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्ण होण्यास दोन दशके लागली. खासगी कंपन्यांकडून राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आला आणि आता सार्वजनिक-खासगी संयुक्त उपक्रमाचा शिक्का बसला आहे. सध्या त्याचे भविष्य अनिश्चित असून त्याच्या व्यवहार्यतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शक्यता अगोदरच…
लोनाक सरोवर हे सिक्कीमच्या 14 हिमनदी तलावांपैकी एक असून त्याच्या फुटण्याची भीती अगोदरपासूनच होती. शास्त्रज्ञांनी त्याचे वर्णन हिमनदी सरोवर ‘आउटबर्स्ट फ्लड’साठी अत्यंत संवेदनशील म्हणून केले आहे. असंख्य अभ्यासकांव्यतिरिक्त केंद्रीय जल आयोगानेही 2015 च्या अभ्यासात तिस्ता नदीवर बांधलेले बहुतांश जलविद्युत प्रकल्प अशा परिस्थितीच्या दृष्टीने अत्यंत असुरक्षित असल्याचा इशारा राज्य सरकारला स्पष्टपणे दिला होता. केंद्र सरकारने यावषी 29 मार्च रोजी संसदेत एक अहवाल सादर केला होता. ज्यामध्ये हवामान बदलामुळे हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत असल्याचे सांगण्यात आले होते. हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांच्या पाण्याच्या पातळीमुळे कधीही नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते, अशी भीती सरकारने मान्य केली आहे. हिमनद्या वितळल्यामुळे ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड (जीएलओई), हिमनग कोसळणे, हिमस्खलन इत्यादी नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढला आहे. गेल्या काही दशकांमध्ये हिमालयातील हिमनद्या पूर्वीच्या तुलनेत दहापट वेगाने वितळत आहेत. ते वितळल्यामुळे समुद्राची पातळी 0.92 ते 1.38 मिमीने वाढली आहे.
आणखीही आपत्तींचा धोका
सिक्कीममध्ये आलेल्या महापुरात अनेक भागांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने मंगन जिह्यातील लाचेनजवळील शाको चो तलावाच्या काठावरून रहिवाशांना बाहेर काढण्यास सुऊवात केली आहे. हा तलाव फुटण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाला सतर्कतेचा इशारा द्यावा लागला आहे. शाको चो ग्लेशियल तलाव थांगू गावाच्या वर आहे. हा तलाव 1.3 किमी लांब असून रहिवासी भाग त्याच्यापासून फक्त 12 किमी अंतरावर आहे. हा तलाव फुटण्याचा धोका असल्यामुळे गंगटोक जिह्यातील सिंगटाममधील संपूर्ण गोलितार परिसर, मंगन जिह्यातील डिचू आणि पाकयोंग जिह्यातील रंगपो आयबीएम परिसर अधिकाऱ्यांनी रिकामा केला आहे. संभाव्य आपत्तीमुळे लाचेन, चुंगथांग, डिक्चू, सिंगटाम, मणिपाल, रांगपो, बारा मुंगवा गावे आणि नदीच्या 175 किमीचा परिसर प्रभावित होऊ शकतो. तसेच तिस्ता नदीवरील किमान एक ते सहा जलविद्युत प्रकल्प प्रभावित होऊ शकतात.
लष्कराचे मोठे ‘ऑपरेशन’
भारतीय लष्कराने सिक्कीममधील पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. पुरामुळे तुटलेली गावे पुन्हा जोडण्यासाठी लष्कर मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवत आहे. सध्या त्यांचे लक्ष चुंगथांगमार्गे उत्तर सिक्कीमशी कनेक्टिव्हिटी पुनर्संचयित करण्यावर आहे. या भागात विनाशकारी पुराच्यावेळी सर्वात जास्त परिणाम झाला होता. सैन्याने कठीण प्रदेशातून आव्हानात्मक ‘ऑपरेशन’ सुरू केले असून चुंगथांगच्या वायव्येकडील राबोमच्या एकाकी गावांमध्ये पोहोचत अनेकांचे प्राण वाचविले आहेत. भारतीय लष्कर गेल्या आठवड्यापासून पुरामुळे तुटलेल्या भागांना जोडण्यात व्यग्र आहे. दळणवळण सुरळीत करून कनेक्टिव्हिटी त्वरित पुनर्संचयित करणे, नुकसानीचे मूल्यांकन करणे आणि संपर्क तुटलेल्या व सैन्य उपस्थित नसलेल्या भागात दीर्घकालीन पुनर्बांधणीच्या दृष्टीने मोहीम पुढे नेली जात आहे. उत्तर सिक्कीममधील चाटेन, लाचेन, लाचुंग आणि थांगू भागातील सर्व पर्यटक आणि स्थानिकांच्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. संपर्क तुटलेली गावे पुन्हा जोडण्याचे काम भारतीय लष्कराने सुरू केले आहे. आयटीबीपी आणि स्थानिक लोकांसह लष्कराच्या जवानांनी चुंगथांग ते पँगाँगला जोडणारा लाचेन चूवर एक मोठा पूल बांधला आहे. लष्करी तुकडीतील जवान 24 तास काम करून उत्तर सिक्कीममधील दळणवळण दुवे पूर्ववत करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री पी. एस. तमांग यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्त्वात वेगवेगळ्या नियोजन बैठकांच्या माध्यमातून सिक्कीमला पुन्हा सावरण्यासाठी बळ दिले जात आहे. केंद्र सरकार, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय संघटनांकडूनही या सर्व प्रयत्नात मदतीचा हात लाभत आहे.
सिक्कीमच्या उत्तर भागात मंगन जिल्हा आहे. चुंगथांग हे त्याचे उच्च उंचीचे क्षेत्र आहे. त्याच्या कुशीत दक्षिण लोनाक तलाव आहे. हे एक नैसर्गिक गोड्या पाण्याचे सरोवर आहे. लोनाक तलावाची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे 17,000 फूट आहे. हा तलाव सुमारे 260 फूट खोल, 2 किलोमीटर लांब आणि अर्धा किलोमीटर ऊंद आहे. या तलाव क्षेत्रात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानंतर या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अचानक मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे तलावाच्या भिंतींना तडे गेले. हा तलाव उंच टेकड्यांमध्ये असल्याने पाणी खालच्या भागात वेगाने वाहू लागले. अन् त्यानंतर सिक्कीमसह देशभरात खळबळ निर्माण करणाऱ्या आपत्तीची व्याप्ती हळूहळू वाढतच गेली. एकंदर परिस्थिती पाहता राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कायदेशीर आणि हवामानास अनुकूल असलेल्या मुद्यांवर गांभीर्याने पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे तज्ञांचे मत आहे. राज्यात अजूनही ‘आपत्तींचे डोंगर’ कोसळत असून सिक्कीम पूर्णपणे सावरलेला नाही. अनेक लोक निवासी छावण्यांमध्ये राहत असून त्यांचे परतीचे मार्ग बंद झाले आहेत. लष्करासह अन्य यंत्रणांकडून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली असून त्यांच्या प्रयत्नांना संथगतीने यश येत आहे.
संकलन : जयनारायण गवस्









