प्रतिनिधी, दापोली
Ratnagiri News : जिल्ह्यात गेले 10 दिवस पावसाची संततधार सुरु आहे. अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी दापोली शहरातील टांगर गल्ली येथे एका रहिवासी इमारतीवर लगतचा मातीचा डोंगर कोसळल्याने इमारतीतील सदनिकेचे मोठे नुकसान झाले.यातील एक सदनिकाधारक केवळ 2 सेकंदाच्या अंतराने बचावला.शुक्रवारी सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे दुपारच्या सुमारास खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्यीची पातळी ओलांडता नदीकाठच्या रहिवाशांसह व्यापाऱ्यांच्या उरात धडकी भरली होती. मात्र सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर काही अंशी ओसरल्याने पूरस्थितीचा धोका टळला.
भिंत कोसळून चिरे व बिम थेट बेडरूममध्ये!
दापोली शहरातील टांगर गल्ली येथे एस.एम.हार्मोनी नावाची रहिवासी इमारत आहे. ही इमारत बांधताना बांधकाम व्यावसायिकाने उभा डोंगर कापून इमारती करता जागा करून ही इमारत बांधली आहे. या इमारती लगतचा मातीचा डोंगर कोसळू नये,यासाठी बांधकाम व्यावसायिकाने केवळ चाऱ्याची भिंत उभी केली होती.मात्र शुक्रवारी झालेल्या धुवाधार पावसाने येथील माती सैल होऊन ही भिंत मातीसह कोसळली.यामुळे इमारतीमधील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या रेहाना शेख यांच्या बेडरूमच्या भिंतीवर ही भिंत कोसळून भिंतीतील चिरे व बिम थेट बेडरूममध्ये येऊन पडला.रेहाना या 2 सेकंदापूर्वीच बेडरूममधून बाहेर आल्याने वाचल्या. मात्र या घटनेमध्ये रेहाना शेख यांचे सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले. महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच खेड येथील बांधकाम व्यावसायिकांनी येऊन इमारतीची पाहणी केली. शिवाय या इमारतीला संरक्षण म्हणून सिमेंटची रिटर्निंग वॉल बांधून देण्याची आश्वासन रहिवाशांना दिले आहे.