जुन्या बुधगाव रोडवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली: :चारचाकी वाहनांना पुर्णपणे बंदी : सांगलीच्या बाजूने पुलाच्या कामाला सुरूवात
सांगली प्रतिनिधी
सांगली माधवनगर रोडवरील चिंतामणीनगर पाठोपाठ जुन्या बुधगाव रोडवरील रेल्वेच्या नव्या उड्डाणपुलाच्या कामाला सोमवारपासून प्रारंभ झाला. येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे निम्म्या रस्त्यात ठेकेदारांकडून बॅरेकेटस लावून नव्या पुलाच्या उभारणीच्या कामाला सुरूवात करण्यात आली. यामुळे येथे वाहतूकीची काही प्रमाणात कोंडी होण्याची शक्यता असली तरी सांगलीतील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या मागणीनुसार पंचशीलनगर येथे गेटच्या ठिकाणी उड्डाणपुल उभारणाऱ्या ठेकेदारांकडून रेल्वेगेटच्या ठिकाणी काही अंतर सोडून कामाला सुरूवात करत वाहनचालकांची कोणतीही अडचण होणार नाही अशी स्पष्ट ग्वाही यावेळी देण्यात आली.
चिंतामणीनगर पाठोपाठ जुन्या बुधगाव रोडवरही उड्डाणपुल उभारण्याबातची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. येथील नवा उड्डाणपुल दुपदरी असून हा पुल पुढील 450 दिवसात पुर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे साधारणपणे सव्वा वर्ष येथे काम सुरू राहणार आहे. चिंतामणीनगरच्या चारपदरी उड्डाणपुलाचे काम अजूनही सुरूच आहे. हे काम आणखी दीड ते दोन महिने तरी सुरू राहणार आहे. त्यामुळे पंचशीलनगर येथील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येऊ नये अशी मागणी सांगलीतील विविध राजकीय पक्ष व संघटनांनी केली होती. पण मध्य रेल्वेच्या पुणे मिरज ते लोंढा या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम जवळजवळ पुर्ण होत आले आहे.
आत्तापर्यंत 80 टक्क्याच्या वरती काम पुर्ण झाले आहे. मार्च 2025 पर्यंत हे काम पुर्ण करण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्यामध्ये पुणे ते मिरज या मार्गावरील रेल्वेची सर्व गेट पुर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. त्याठिकाणी एक तर उड्डाणपुल वा भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जुना बुधगाव रोड येथेही उड्डाणपुल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारपासून या कामाला सुरूवात झाली. पण हे काम सुरू करत असताना येथे वाहतूकीची मोठया प्रमाणात कोंडी होण्याची व पुलाचे काम पुर्ण होईपर्यंत रेल्वेगेट बंद होणार की काय अशी भिती वाहनचालकांतून व्यक्त होत होती. त्यापार्श्वभुमिवर सोमवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सर्वपक्षीय कृती समितीचे सतिश साखळकर, उमेश देशमुख, राष्ट्रवादी सेवा दलाचे महालिंग हेगडे, गजानन साळुंखे, सुनिल मोहिते, आनंद लिगाडे, महेश शिंदे, फारूक शेख, युवराज पवार यांनी उड्डाणपुलाचे काम करणारे ठेकेदार कौलगुड यांची भेट घेवून कामाबाबत माहिती घेतली. त्यानुसार येथे रेल्वेगेटच्या ठिकाणी वाहनचालकांची कोणतीही अडचण होणार नाही. वाहतूक एका बाजूने सुरू ठेवून रस्त्याच्या निम्म्या भागात उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. वाहनाची वेगमर्यादी ताशी 20 कि.मी. ठेवण्यात आली आहे. येथून चारचाकी गाडयांना पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. केवळ रिक्षा आणि दुचाकी वाहने येथून जातील असे सांगण्यात आले. सागंलीच्या दिशेने पुलाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.