तिस्क उसगाव येथील ट्रक पार्किंग अपघातांस कारणीभूत
वार्ताहर /उसगाव
तिस्क उसगाव येथील एमआरएफ कंपनीसमोर रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्तपणे पार्क केल्या जाणाऱया मालवाहू ट्रक व कंटेनर्समुळे अपघातांचा धोका वाढला असून सोमवारी अशाच एका अपघातात दुचाकीचालक गंभीर जमखी झाला. अवजड कंटेनर रस्त्यावरच वळविण्याच्या बेपर्वाइमुळे उसगावहून फोंडय़ाकडे निघालेली स्प्लेंडर मोटारसायकल या कंटनेच्या खाली सापडली. त्यात घनश्याम कुंकळय़ेकर (39, रा. ताळगाव) हा गंभीर जखमी झाला. सोमवारी सकाळी 7 वा. सुमारास हा अपघात झाला.
जखमीला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. एमआरएफ कंपनीसमोर गोवा बेळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने मालवाहू ट्रक व अवजड कंटेनर्स नियमितपणे पार्क केले जात असल्याने दोन्ही बाजूने ये जा करणाऱया वाहनांना समोरील रस्त्याचा अंदाज येत नाही. बऱयाचवेळी हे अवजड कंटेनर तेथून निघताना भर रस्त्यात वळवून वाहतुकीत व्यत्यय आणतात. गोवा बेळगाव तसेच वाळपई, साखळी, डिचोली व उसगाव या भागातील वाहतूक याच मार्गाने होत असल्याने वाहनांची मोठय़ाप्रमाणात रहदारी सुरु असते. शनिवार व रविवारच्या दिवशी शेजारील कर्नाटक व इतर राज्यातून मोठय़ा संख्येने पर्यटक येत असल्याने हा रस्ता कायम व्यस्त असतो. महामार्गावरुन भरधाव जाणाऱया वाहनांना रस्त्यावर बाजूने बेशिस्तपणे पार्क केलेल्या जाणाऱया या मालवाहू ट्रकांमुळे समोरील रस्त्याच्या अंदाज येत नाही. ज्यामुळे कायम अपघातांचा धोका असतो. यापूर्वी याठिकाणी अनेक छोटे मोठे अपघात झाले असून एक दोन लोकांचे बळीही गेले आहेत. एखादी तक्रार आल्यास किंवा वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर वाहतूक पोलीस चार ते पाच दिवस कारवाईचा फार्स करतात व पुन्हा हे ट्रक रस्त्यावरच दिसतात. एखादी मोठी दुर्घटना होण्यापूर्वी महामार्गावरील हे अडथळे दूर करुन हा परिसर नो पार्किंग झोन जाहीर करावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.









