लनिर्गिं लायसेन्स प्रक्रियेविरोधात असंतोष
बेळगाव : मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल असतानाही आरटीओ विभागाकडून ऑनलाईन लर्निंग लायसेन्स दिले जात आहे. कोणत्याही पानपट्टीवर लर्निंग लायसेन्स काढून दिले जात असल्याने मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल चालक अडचणीत सापडले असून याविरोधात शुक्रवार दि. 8 रोजी हलगा येथील सुवर्णविधानसौधवर मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती फेडरेशन ऑफ कर्नाटक मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल ओनर्स असोसिएशन यांच्यावतीने शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. 2022 पासून नियमावलीत बदल करण्यात आल्याने ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल चालक अडचणीत सापडले आहेत. शिकाऊ चालकांसाठी लर्निंग लायसेन्स देताना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलची सक्ती करावी, याबरोबरच वाहन परवाना मिळविण्यापूर्वी पूर्वीप्रमाणे फॉर्म क्र. 14 ची सक्ती करावी, आरटीओ विभागाकडून होणारा त्रास कमी करावा, या मागण्यांसाठी सुवर्णविधानसौधसमोर आंदोलन केले जाणार आहे. हुबळी येथील सिद्धारुढ मठापासून बाईक रॅली काढून सुवर्णविधानसौधवर मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.यामध्ये उत्तर कर्नाटकासह राज्यभरातील मोटार ट्रेनिंग स्कूलचे चालक सहभागी होणार आहेत. पत्रकार परिषदेवेळी संघटनेचे अध्यक्ष बसवराज कडली, उपाध्यक्ष इजाज तोरगल, सेक्रेटरी एम. ए. शेरेखान यांसह इतर उपस्थित होते.









